मराठीतला पहिला ‘सायन्स फिक्शन’ आणि प्रेमकथापट असलेला ‘फूंतरू’ या सुजय डहाके दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून हा चित्रपट पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. इरॉस इंटरनॅशनल या बॅनरने या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण केले असून क्रिशिका लुल्ला निर्मात्या तर अजय ठाकूर हे सहनिर्माते आहेत. ‘टाईमपास’फेम अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर ही प्रमुख भूमिकेत असून मदन देवधर, शिवराज वाीचाल, शिवानी रांगोळे, ऋतुराज शिंदे, रोहित निकम हे अन्य कलावंत आहेत. तंत्रज्ञानाचा अतिवापर झाला की काय होऊ शकतो याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अर्चना बोऱ्हाडे यांनी चित्रपटाचे छायालेखन केले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कथानक बेतण्यात आले आहे. ‘फूंतरू’ या शीर्षकाची घोषणा केल्यापासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

नात्यांच्या शोधात ‘अनुराग’
पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या प्रकारे भाष्य करणारा ‘अनुराग’ हा चित्रपट पुढील वर्षी २१ जानेवारीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केवळ दोनच व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण लेह-लडाख येथे करण्यात आले आहे. डॉ. अंबरीश दरक हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून मृण्मयी देशपांडे व धर्मेद्र गोहिल हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. मृण्मयी देशपांडे यांनी चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले आहे.

झी टॉकिजवर ‘डबल सीट’

अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘डबल सीट’ या गाजलेल्या चित्रपटाचे प्रसारण ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’वरून केले जाणार आहे.

‘शिवा’
लहान मुलांसाठी असलेल्या ‘शिवा’ या कार्यक्रमासाठी नवीन शीर्षक गीत तयार करण्यात आले असून साजिद वाजिद यांनी त्याचे संगीत दिले आहे. ‘शिवा’चा प्रीमिअर ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘निक’ वाहिनीवर होणार आहे.