आत्ताआत्तापर्यंत आपली चुलत बहीण परिणीतीला बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी प्रियांका चोप्राची धडपड सुरू होती. तिला चांगले चित्रपट मिळावेत म्हणून प्रयत्न करणारी प्रियांका बॉलिवूड मंडळींबरोबर तिच्या चित्रपटाला आवर्जून हजेरी लावत होती. मात्र, बहिणीच्या करिअरची कितीही काळजी घेत असली तरी अभिनेत्री म्हणून आपले सर्वोत्तम पद टिकावे यासाठी जिवाचे रान करणाऱ्या प्रियांकाला आत्तापर्यंत एकच चिंता सतावत होती. आपले दोघेंचेही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर..? ही धास्ती प्रियांकाला होती. प्रियांकाचा ‘जंजीर’ आणि परिणीतीचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याने प्रियांकासमोर आत्ता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.‘डॉन’, ‘अग्निपथ’ नंतर ‘जंजीर’ हा प्रियांकाचा तिसरा मोठा रिमेक चित्रपट आहे. ‘बर्फी’च्या यशानंतर आंतरराष्ट्रीय गायक म्हणून आपला ठसा उमटवण्यावर तिने लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे ‘जंजीर’ आणि ‘क्रिश ३’ असे दोन बिग बजेट चित्रपट आणि रणवीर सिंग-अर्जुन कपूरचा ‘गुंडे’ हा तिसरा एवढेच चित्रपट या घडीला तिच्याकडे आहेत. आणि त्यातला प्रत्येक चित्रपट तिच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ‘जंजीर’ खरेतर मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. पण, वादांमुळे तो रखडत राहिला आणि आता ६ सप्टेंबर ही तारीख प्रदर्शनासाठी निश्चित झाली आहे. पुन्हा एकदा हा चित्रपट मागे-पुढे ढकलणे निर्मात्यांसाठी तापदायक ठरणार असल्याने ६ सप्टेंबरची ‘जंजीर’ सुटणार नाही आहे. तर दुसरीकडे परिणीतीचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ही त्याच तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे यशराज बॅनरने जाहीर केले आहे.
‘जंजीर’ आणि ‘शुद्ध देसी रोमान्स’ दोन्ही चित्रपट एकमेकांशी टक्कर देऊ शकतील, असे आहेत. कारण ‘जंजीर’ बिग बजेट चित्रपट असला तरी प्रियांकाबरोबरचा नायक रामचरण तेजा हा बॉलिवूडसाठी नवीनच चेहरा आहे. तर दुसरीकडे ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये परिणीतीबरोबर चर्चेचा विषय ठरणार आहे तो सुशांतसिंग राजपूत. झी टीव्हीवरच्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिध्द झालेल्या सुशांतने ‘कायपोचे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात सुशांतला इतकी लोकप्रियता मिळाली आहे की बडय़ा निर्मात्यांच्या चित्रपटांची रांग त्याच्याकडे लागली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये आणि परिणामी या दोन चोप्रा बहिणींमधली तिकीटबारीवरची टक्करही अटळ आहे!

Story img Loader