उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये एका वयस्कर व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवरून निर्माण झालेला वाद चिघळू लागला आहे. या प्रकरणी आता दिल्लीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करसोबतच ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरे यांच्यासह अन्य काही जणांवरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गाझियाबाद प्रकरणाशीसंबधीत काही ट्वीट शेअर केल्याने अभिनेत्री स्वरा भास्कररदेखील या प्रकरणात अडकली आहे.
दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात अॅडव्होकेट अमित आचार्य यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरुन दिल्ली पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मात्र पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी याआधी गाझियाबाद पोलिसांनी ९ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये काँग्रेसचे नेते, पत्रकार, ट्विटरच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. लोणी बॉर्डर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षकाने हा गुन्हा दाखल केला आहे.
गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणामध्ये पत्रकार मोहम्मद झुबैर, राणा आयुब यांनी या प्रकरणासंदर्भात ट्विट केल्याने त्यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश केलाय. याशिवाय काँग्रेस नेते सलमान नाझमी, शमा मोहम्मद आणि मसकुर उस्मानी, लेखिका साबा नक्वी, द वायर ही कंपनी, ट्विटर आयएनसी आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केलाय. कोणतीही शहानिशा न करता वयोवृद्ध व्यक्तीचा व्हि़डीओ व्हायरल केल्याचा आरोप करत या प्रकरणामध्ये देण्यात आलेली सर्व माहिती चुकीची असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
तर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत या सर्वांनी या व्हिडीओची सत्यता न पडताळता व्हिडीओ व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचं म्हंटलं आहे.
काय घडलं?
व्हायरल व्हिडीओमधील वयस्कर व्यक्तीने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र ही वयस्कर व्यक्ती त्या लोकांना ओळखत होती. तसेच तिथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अब्दुल समद ५ जून रोजी बुलंदशहरमधून बेहटा (लोणी बॉर्डर) येथे आले होते. इथून अब्दुल समद एका अन्य व्यक्तीसोबत मुख्य आरोपी असणाऱ्या परवेश गुज्जरच्या बंथला (लोणी) येथील घरी गेले होते. त्यानंतर परवेशच्या घरी काही वेळात इतर मुलं आली. यामध्ये परवेशसोबत मिळून त्यांनी अब्दुल समद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल समद हा तावीज बनावायचं काम करायचा. अब्दुल समदने बनवलेल्या एका तावीजचा कुटुंबावर उलट परिणाम झाल्याच्या रागातून त्यांना जाब विचारत मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर राजकारण देखईल तापू लागलं होतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही ट्वीट केलं होतं. यावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला बदनाम करु नये असा सल्ला राहुल यांना दिला होता.