Conan O Brien Speaks Hindi Oscar 2025 stage Video : ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सांगता झाली आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आज (३ मार्च रोजी) अकादमी अवॉर्ड्स पार पडले. जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑस्करचा होस्ट कॉनन ओ’ब्रायनने आपल्या वेगळ्या स्टाईलने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
कॉनन ओ’ब्रायनने पहिल्यांदाच यंदाचा ऑस्कर सोहळा होस्ट केला. जगभरातील अनेक देशामध्ये ऑस्कर सोहळा लाइव्ह प्रसारित करण्यात आला. अनेक देशांमधील प्रेक्षक हा सोहळा लाइव्ह पाहत असल्याने कॉननने स्पॅनिश, हिंदी, चायनीज आणि इतर काही भाषांमध्ये प्रेक्षकांचे स्वागत केले. कॉननचं हिंदी हे समजायला थोडं कठीण होतं; कारण त्याचा उच्चार वेगळा होता, पण त्याचा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
जे भारतातून हा सोहळा पाहत आहेत, त्यांना उद्देशून कॉनने केलेलं विधान चर्चेत आहे. त्याच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “भारतातील लोकांना नमस्कार. तिथे सकाळ झाली आहे, तर मला आशा आहे की तुम्ही नाश्ता करता करता ९७ वे अकादमी अवॉर्ड्स पाहत असाल,” असं कॉनन ओ’ब्रायन म्हणाला.
पाहा कॉनन ओ’ब्रायनचा व्हिडीओ
कॉनन ओ’ब्रायन कोण आहे?
कॉनन ओ’ब्रायन हा एक अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट, कॉमेडियन, अभिनेता, लेखक आणि निर्माता आहे. कॉनन ओ’ब्रायन ‘लेट नाईट विथ कॉनन ओ’ब्रायन’, ‘द टुनाईट शो विथ कॉनन ओ’ब्रायन’ आणि ‘कॉनन’ यांसारखे लेट नाईट टॉक शो होस्ट करण्यासाठी ओळखला जातो.
यंदा कोणत्या चित्रपटाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार?
ऑस्कर २०२५ मध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा चित्रपट ‘अनोरा’ ठरला आहे. एका सेक्स वर्करच्या कथेवर आधारित या चित्रपटाला पाच श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आहे. तसेच मिकी मॅडिसनला ‘अनोरा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे. सीन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘अनोरा’साठी त्याने हा पुरस्कार पटकावला आहे.