प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियावर त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीका होत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या ताज्या भागात रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी व अपूर्वा मखिजा या क्रिएटर्सनी हजेरी लावली होती. या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाला रणवीरने आई-वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारला होता. ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर चौफेर टीका झाली.
रणवीर अलाहाबादियावर सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी रणवीरने माफी मागितली असली तरी हे प्रकरण खूपच तापलेलं आहे. मुंबई पोलिसांना याप्रकरणी तक्रार मिळाली असून चौकशी सुरू आहे. रणवीरच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय नेतेही भडकले होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. त्यांनी समय रैनाला थोबाडीत मारण्याचे वक्तव्य केले आहे.
रणवीर अलाहाबादियाचे वक्तव्य काय?
शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“जर तो माझ्यासमोर आला तर मी जितक्या जोराने त्याच्या त्याच्या थोबाडीत मारू शकतो, तेवढं मारेन. हा माणूस एक मिनिटही बाहेर फिरण्याच्या लायकीचा नाही. हा शो बंद करायला हवा. पंतप्रधानांनी अशा लोकांचा गौरव करण्यापूर्वी विचार करायला हवा,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे.”