संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाल्यापासून एकूणच सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली पेशव्यांच्या इतिहासाचा दिग्दर्शकाने खेळखंडोबा केला असल्याची टीका समाजमाध्यमातून होते आहे. ‘पिंगा’ या गाण्यात बाजीरावांची पत्नी काशीबाई आणि प्रेमिका मस्तानी या दोघीही एकत्र नृत्य करताना दाखवल्या असून पेशव्यांच्या इतिहासात असा कुठलाही संदर्भ नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पेशव्यांच्या इतिहासात फेरफार करण्याचा अधिकार भन्साळींनी कुणी दिला, असा सवाल करण्यात येत आहे.
चित्रपटाचा प्रोमो आणि दीपिका पदुकोण-प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालेले ‘पिंगा’ हे गाणे पाहता चित्रपटात तत्कालीन सांस्कृ तिक संदर्भ आणि कथेचे विकृत चित्रीकरण करण्यात आले असल्याची टीका प्रसादराव पेशवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. मूळ इतिहासात फेरफार करून चित्रित केलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण राज्य सरकारने तपासावे आणि मगच चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘अिजक्य योद्धा बाजीराव’ या कादंबरीचे लेखक जयराज साळगावकर यांनीही गल्ला भरण्यासाठी भन्साळींनी बाजीरावाच्या कुटुंबाच्या नावावर हा अधिक्षेप केला असल्याची टीका केली. या कादंबरीच्या निमित्ताने बाजीराव पेशव्यांवरच्या सगळ्या संदर्भग्रंथांचा आपण अभ्यास केला असून ज्या मस्तानीला बाजीरावांच्या कुटुंबाने, त्यांचा जिवलग भाऊ चिमणाजीनेसुद्धा अव्हेरले होते. काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचतीलच कशा, असा प्रश्न जयराज साळगावकर यांनी केला आहे. काशीबाई या एका पायाने अधू होत्या. त्यामुळे त्या नाचू शकत नाहीत. ‘पिंगा’ हे गाणे लावणी स्वरूपात दाखवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.