कौटुंबिक ऋणानुबंध, प्रेम आणि आत्मशोधाची हृदयस्पर्शी कथा मांडणारी ‘बडा नाम करेंगे’ ही हिंदी वेबमालिका ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली आहे. विशेष बाब म्हणजे या वेबमालिकेच्या माध्यमातून ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ने ओटीटी माध्यमावर पदार्पण केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘राजश्री प्रॉडक्शन्स’चे सर्वेसर्वा सूरज बडजात्या यांच्याशी साधलेला हा संवाद.

कौटुंबिक वातावरण आणि अनोखी प्रेमकथा संपूर्णत: कौटुंबिक वातावरण आणि एक अनोखी प्रेमकथा ‘बडा नाम करेंगे’ या वेबमालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना ओटीटीकडे खेचून आणण्याच्या उद्देशाने ‘राजश्री प्रॉडक्शन्स’कडून एका वेगळ्या आशयावरील वेबमालिकेची आवश्यकता असल्याचे ‘सोनी लिव्ह’कडून सांगण्यात आले होते. कौटुंबिक मनोरंजक आशय हेच आमचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे थरार आणि अॅक्शनच्या पलीकडे जाऊन संपूर्ण कुटुंब एकत्र बसून वेबमालिका पाहू शकेल, यावर आम्ही भर दिला. ही कथा २०१३ पासून आमच्याकडे होती, त्यानंतर पुनर्लेखनासह कथानकाला अंतिम आकार देण्यासाठी जवळपास अडीच वर्षे लागली. त्यानंतर ५० ते ६० दिवसांच्या कालावधीत इंदौर, उज्जैन, रतलाम याठिकाणी चित्रीकरण झाले. कथानकातील सहजता व साधेपणा या गोष्टी वेबमालिकेचे वेगळेपण अधोरेखित करतात. त्यामुळे प्रेक्षक निश्चितच या वेबमालिकेकडे आकर्षित होतील, असा विश्वास सूरज बडजात्या यांनी व्यक्त केला.

प्रेक्षकांना कथानक आपलेसे वाटेल

‘बडा नाम करेंगे’ या वेबमालिकेच्या कथानकाचा फक्त प्राथमिक आराखडा २०१३ साली तयार होता. त्यानंतर २०२० साली पुनर्लेखन करण्यात आले आणि वेबमालिकेच्या अनुषंगाने दिग्दर्शक पलाश वासवानी यांनी आकार दिला. हे कथानक सध्याच्या युवा पिढीला कसे जवळचे वाटेल, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. या वेबमालिकेतील मुलाचे रतलाम येथे मिठाईचे दुकान असते आणि कुटुंबात रुळलेल्या या मुलाला दुकानाचा मुंबईपर्यंत तसेच देशाबाहेरही विस्तार करायचा असतो. याच कुटुंबातील मुलीला सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमासाठी मुंबईतील महाविद्यालयात प्रवेश मिळतो. मुंबईतील गर्दीत व धावपळीच्या वातावरणात मुलीचे कसे होईल, याबद्दल तिच्या आईला चिंता असते. आईने चिंता करत बसू नये, यासाठी मुलगी काही वेळेला खोटेही बोलून जाते. त्यामुळे हा भोळेपणा आणि निखळ प्रेम हे प्रेक्षकांना आपलेसे वाटेल आणि ते कथानकाशी जोडले जातील, असे सूरज बडजात्या म्हणाले.

कथानकातील सहजता आणि साधेपणा या जमेच्या व महत्त्वाच्या बाजू आहेत. आम्ही कोणताही हिंसाचार दाखवलेला नाही, त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे एकत्र बसून ही वेबमालिका पाहू शकते. एका उत्तम कथानकाला न्याय देण्यासाठी या वेबमालिकेची निर्मिती करण्यात आली. गोपाळकाल्याचा मोठा उत्सव तसेच पाच गाणीही यात आहेत. आम्हाला एक दर्जेदार कलाकृती पाहायची आहे, असे मला अनेक जण भेटून सांगतात. त्यामुळे ‘बडा नाम करेंगे’ हा त्या प्रेक्षकांसाठी उत्तम पर्याय असल्याचे मत सूरज बडजात्या यांनी व्यक्त केले.

भूमिकांच्या अनुषंगाने कलाकारांची निवड

जेव्हा ‘बडा नाम करेंगे’ या वेबमालिकेची कथा लिहून पूर्ण झाली, तेव्हा कथेच्या अनुषंगाने नवोदित कलाकारांची आवश्यकता असल्याचे जाणवले. या कथानकात सहजता, साधेपणा, भोळेपणा आणि निखळ प्रेम या गोष्टींसह मानवी भावभावनांचा वेध घेण्यात आला आहे. त्यामुळे या कथानकाच्या अनुषंगाने प्रसिद्ध कलाकारांऐवजी नवोदित अभिनेता व अभिनेत्रींना संधी देण्यात आली. तसेच इतरही भूमिकांना अनुरूप कलाकारांची निवड करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण चित्रीकरण हे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले, असे सूरज बडजात्या यांनी सांगितले.

मूल्यांमध्ये तडजोड नाही

‘राजश्री प्रॉडक्शन्स’च्या कोणत्याही कलाकृतीमध्ये मूल्यांची जपणूक करण्यावर भर असतो. प्रेक्षकांनाही आमच्या निर्मिती संस्थेकडून अनेक अपेक्षा असतात, त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कलाकृतींची निर्मिती होते. ‘बडा नाम करेंगे’ या वेबमालिकेत युवा हे मद्यापान तसेच धूम्रपान करताना केवळ कथेची गरज म्हणून दाखविण्यात आले आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आजवर कोणत्याही कलाकृतीत आयटम साँगचा समावेश आम्ही केलेला नाही. त्यामुळे मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड होत नाही, असे बडजात्या यांनी स्पष्ट केले.

पलाश वासवानी यांचे दिग्दर्शन, कलाकारांची मांदियाळी

सूरज बडजात्या यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ‘बडा नाम करेंगे’ या वेबमालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा पलाश वासवानी यांनी सांभाळली आहे. आधुनिक पिढीतील जोडपे रिषभ व सुरभी यांचा प्रवास या वेबमालिकेत मांडण्यात आला आहे. हे जोडपे स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासह पारंपरिक कौटुंबिक मूल्ये जपण्याचा प्रयत्न करते. प्रेम, परंपरा व आत्मशोध या गोष्टींचा सुरेख संगम ‘बडा नाम करेंगे’ या वेबमालिकेच्या माध्यमातून साधण्यात आला आहे.

Story img Loader