गुंड अरुण गवळीची भेट घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता अर्जुन रामपालचा जबाब नोंदवला आहे. आगामी चित्रपटात गवळी यांची व्यक्तिरेखा साकारत असून त्यांचे व्यक्तिमत्त्व समजावून घेण्यासाठीच ही भेट घेतल्याचे रामपाल याने पोलिसांना सांगितले.
मंगळवारी पोलिसांनी अभिनेता अर्जुन रामपालचा या भेटीसंदर्भातील जबाब नोंदवून घेतला. २८ डिसेंबरला जेजे रुग्णालयात रामपालने गुंड अरुण गवळी याची भेट घेतली. त्यामुळे जेजे मार्ग पोलिसांनी रामपालला समन्स बजावले होते. या भेटीमागचे कारण देताना रामपाल याने पोलिसांना सांगितले की, ही भेट अवघी १० मिनिटांची होती. मी डॅडी नावाचा एक चित्रपट करतोय. त्यात अरुण गवळीची भूमिका साकारतोय. त्यासाठीच ही भेट झाल्याचा दावा रामपाल याने केला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अर्जुन रामपाल दक्षिण मुंबईतील काही लोकेशन्स शोधत होता. त्यावेळी अरुण गवळी याला जेजे रुग्णालयात तपासणीसाठी आणल्याची माहिती रामपालला मिळाली. त्याने लगेच रुग्णालय गाठले. परंतु सुरक्षा रक्षकांनी भेटू दिले नव्हते. नेमके त्याच वेळेस अरुण गवळी बाहेर आला आणि दोघांची भेट झाली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अरुण गवळी सध्या नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Story img Loader