ओडिशा राज्यात शुक्रवार दिनांक २ जून रोजी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. आतापर्यंत या अपघातात जवळपास २६१ जणांचा मृत्यू झाला असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. या घटनेबाबत अभिनेत्री व शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले यांनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद आहे असे त्यांनी म्हटले आहे.
“शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरून ओडिशात मोठी दुर्घटना झाली. ओडिशातील बाळेश्वरजवळ झालेली दुर्घटना अतिशय भीषण, दुर्दैवी आणि दु:खद आहे. या अपघातात बळी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…देव त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो…जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना” असे म्हणत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : “नमस्ते दर्शको…” कोणी केली सारा अली खानची हुबेहूब नक्कल?; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून अभिनेत्री म्हणाली…
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले यांच्याप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्मा, अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, किरण खेर, सोनू सुद, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी अशा अनेक सेलिब्रिटींनी ट्वीट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारेही मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
दरम्यान, ओडिशामध्ये झालेला रेल्वे अपघात हा मागच्या दोन दशकातील सर्वात मोठा अपघात आहे. १९९९ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.