पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर अनेक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे येत आहेत. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर काही वेळातच २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची चर्चा सुरु आहे. आमीर खानने करोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे २५० कोटींची मदत दिल्याचा दावा केला जात आहे. आमीर खानचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, आमीर खानने २५० कोटींची मदत केली. या व्हिडीओत आमीर खान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करत असून दोघेही बसून गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओला चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
पण व्हिडीओची माहिती पडताळून पाहिली असता हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ सहा वर्ष जुना आहे. आमीर खानने २३ जून २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली होती.
आमीर खानच्या या भेटीमागे काही खास कारण नव्हतं. यावेळी आमीर खान आपला टीव्ही शो सत्यमेव जयतेची डीव्हीडी घेऊन आला होता. महत्त्वाचं म्हणजे आमीर खानने त्यावेळी या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारं ट्विटदेखील केलं होतं.
त्यामुळे आमीर खानने २५० कोटींची मदत केल्याचा दावा खोटा आहे. सोबतच हा व्हिडीओ सहा वर्ष जुना असल्याचं समोर आलं आहे.