बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं अलिकडेच ५० वा वाढदिवस साजरा केला. करणनं त्याच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म स्टुडिओमध्ये जंगी पार्टी दिली होती. ज्यात हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांच्यासह इतर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. पण आता मात्र त्याचं या जंगी सेलिब्रेशन करोनाचा सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरल्याचं बोललं जात आहे. करण जोहरच्या पार्टीतील तब्बल ५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘बॉलिवूड हंगमा’च्या रिपोर्टनुसार, करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींमधील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाली आहे. पण बदनामीच्या भीतीने ते करोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती देत नाहीयेत. सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या जवळच्या मित्रपरिवारातील बऱ्याच लोकांना या पार्टीनंतर करोनाचं संक्रमण झालं आहे.
आणखी वाचा- “हे तर बेकायदेशीर आहे…” संस्कृती बालगुडेच्या फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत
सूत्रांनी सांगितलं, “अनेकांनी करोना संक्रमित असल्याची माहिती लपवली आहे. पण त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कार्तिक आर्यन करण जोहरच्या पार्टीमध्ये नव्हता. मात्र अभिनेत्री कियारा आडवाणी या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे कार्तिकला तिच्यामुळे करोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर कियारानं कार्तिकसोबत त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं.”
आणखी वाचा- कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा करोनाची लागण, म्हणाला, “सगळं काही सकारात्मक सुरु असताना…”
दरम्यान कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या २’ अलिकडेच प्रदर्शित झाला. त्याआधी कार्तिक आणि कियारानं चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. कार्तिक आर्यननं नुकतीच करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. मात्र कियाराबाबत अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही किंवा कियारानं यावर कोणतीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. याशिवाय अभिनेता आदित्य रॉय कपूरला देखील करोनाची लागण झाली आहे.