करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरातील हजारो लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. या विषाणूमुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, काही धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर बऱ्याच ठिकाणी लहान-मोठे उद्योगही बंद करण्यात आले आहेत. मात्र या साऱ्यामुळे बऱ्याच उद्योगांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामध्येच बॉलिवूडला देखील आर्थिक फटका बसला असून बॉलिवूडचं तब्बल ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर येत आहे.
‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, जगभरामध्ये करोना विषाणूचं सावट असल्यामुळे सध्या देशामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परिणामी, नागरिक शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळत आहेत. तसंच चित्रपटगृह बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूडला आर्थिक फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. या महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणारं होतं. मात्र चित्रपगृह बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.
करोना विषाणूचं गांभीर्य लक्षात घेता देशातील मुंबई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, बिहार आणि पंजाब येथील चित्रपटगृह बंद ठेवण्यात आल्याचं दिसून येत आहे. “मागील आठवड्यात इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटगृह ओस पडल्यामुळे या चित्रपटाची म्हणावी तशी कमाई झाली नाही. तर ६ मार्च रोजी टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेला ‘बागी 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र त्याकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
करोना विषाणूच्या धास्तीमुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. चित्रपटगृहांकडे प्रेक्षक येत नसल्यामुळे ‘बागी 3’च्या दिग्दर्शकांचं जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर ‘अंग्रेजी मीडियम’च्या विकेंड कलेक्शनवरही त्याचा परिणाम झाला आहे. तसंच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. तर काही चित्रपटांचं चित्रीकरण रद्द केलं आहे. त्यामुळे जवळपास ८०० कोटी रुपयांचा फटका बॉलिवूडला बसला आहे”, असं चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी सांगितलं.
येत्या २४ मार्चला रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तसंच रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ’83’ हा चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा चित्रपट नेमका त्याच दिवशी प्रदर्शित होईल की नाही याविषयी साशंकता आहे.
मूळचे बिहारचे असलेले प्रदर्शनकर्ते विशेक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे, “सरकारकडून आदेश देण्यात आल्यानंतर थिएटर बंद करण्यात येत आहेत. मात्र त्यांना त्यांचं भाडे, विजेचं बील, कर्मचाऱ्यांचे वेतन हे द्यावंच लागणार आहे. परंतु चित्रपटगृह बंद असल्यामुळे तिकीटांची विक्रीही होत नाहीये. आता एकच अपेक्षा आहे की हे संकट लवकरात लवकरच टळावं. असं झालं तर चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल पुन्हा वाढेल आणि या दिवसांमध्ये झालेलं नुकसान लवकरच भरुन निघेल”.
दरम्यान, करोना विषाणूमुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. चीनमध्ये जन्माला आलेला हा विषाणू आता ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने प्रयत्न करत आहे.