या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावर्षीच्या शुभारंभालाच ‘नटसम्राट’ हा एकमेव चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमधून झळकला आहे. हिंदी चित्रपटांची तिकीटबारीवरची गणिते मोडून काढत वर्षांची सुरुवात मराठी चित्रपटापासून करण्याएवढा विश्वास मराठी चित्रपट निर्माते, वितरकांना आला आहे. मराठीत आशयात्मक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या लक्षणीय प्रतिसादामुळे हिंदीतील मोठय़ा कॉर्पोरेट स्टुडिओजचे लक्ष इथे वळले आहे. वायकॉम, इरॉससारख्या हिंदीतील कॉर्पोरेट निर्मात्यांबरोबरच मराठीतील ‘झी स्टुडिओ’, ‘एव्हरेस्ट’सारख्या स्वतंत्रपणे उभ्या राहिलेल्या मोठय़ा प्रॉडक्शन कंपन्यांचेही पाठबळ सध्या मराठी चित्रपटांना मिळते आहे. नव्या वर्षांत या संस्थांकडून प्रदर्शित होणारे दर्जेदार चित्रपट मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मात्र मराठीतील या ‘कॉर्पोरेट’ नांदीने नेमके काय साधले जाणार आहे?

मराठीत सध्या छोटय़ा-मोठय़ा मिळून २५ ते ३० निर्मिती संस्था आहेत. त्यात गेली अनेक र्वष स्वतंत्रपणे कार्यरत राहून मोठय़ा झालेल्या ‘एव्हरेस्ट’, ‘मिराह एंटरटेन्मेट’, ‘झी स्टुडिओ’सारख्या निर्मिती संस्था आहेत. तरीही गेल्या वर्षीपासून ‘इरॉस, ‘वायकॉम’ या मोठय़ा कॉर्पोरेट निर्मिती संस्थांनी आपला मोहरा मराठीकडे वळवला आहे. अक्षय कुमारची ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ मराठीत सक्रिय आहे तर संजय लीला भन्साळी प्रॉडक्शन, रोहित शेट्टी प्रॉडक्शन, अजय देवगण फिल्म्स, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि शाहरूख खानची रेड चिलीज एंटरटेन्मेट या कंपन्या मराठीत सक्रिय होण्याच्या दृष्टीने धडपडत आहेत. अचानक झालेल्या या निर्मिती संस्थांच्या गर्दीचा मराठी चित्रपटांना खरोखरच फायदा होणार आहे का? या गर्दीमुळे मराठी चित्रपट निर्मितीतली स्पर्धा वाढेल की परस्पर पूरक ठरेल? अशा शंकाकुशंकांनी चित्रपट वर्तुळात फेर धरला आहे.

‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटाच्या निमित्ताने या वर्षांच्या सुरुवातीलाच मराठी चित्रपट घेऊन येणाऱ्या ‘वायकॉम’ला मराठी चित्रपटांना सातत्याने मिळणारा प्रेक्षकवर्ग महत्त्वाचा वाटतो आहे. मराठी चित्रपटांचे मार्केट आता विकसित झाले आहे. ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’, ‘टाइमपास २’ सारख्या व्यावसायिक चित्रपटांनी मिळवलेले यश पाहता मराठी चित्रपटांची एक निश्चित बाजारपेठ तयार झाली आहे, असे मत ‘वायकॉम’चे मुख्य संचालन अधिकारी अजित अंधारे यांनी व्यक्त केले. हिंदीत सध्या काही एक विचाराने चित्रपट करावे लागतात. मराठीत तसे नाही. इथे मसाला आणि आशयात्मक दोन्ही चित्रपटांच्या दृष्टीने काम करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे दरवर्षी निदान तीन ते चार मराठी चित्रपट करण्याचा ‘वायकॉम’चा मानस असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी इरॉस ‘गुरू’, ‘फुंतरू’ सारखे चित्रपट घेऊन येत आहेत. ‘झी स्टुडिओ’चा ‘नटसम्राट’ बरोबरच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. करण जोहरने रितेशबरोबर ‘माऊली’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. स्वत: रितेशने ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा केली असून भन्साळी प्रॉडक्शनच्या मराठी चित्रपटालाही सुरुवात झाली आहे. मराठी चित्रपटांच्या दृष्टीने ही चांगलीच गोष्ट आहे मात्र यामागे ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांकडून मिळणारा निधी ही जमेची बाजू ठरत असली तरी चित्रपट चांगला असल्यावर निर्माता कोण आहे यापेक्षाही त्याचे नियोजन, मार्के टिंगमधील अनुभव, चित्रपटांच्या निवडीचे ज्ञान या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात, असे मत ‘झी स्टुडिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन केणी यांनी व्यक्त केले. ‘झी स्टुडिओ’ची निर्मिती असलेला ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि आम्ही वितरित करत आहोत तो ‘नटसम्राट’ यात आम्ही फरक करत नाही. दोन्ही चित्रपटांवर आम्ही तेवढीच मेहनत घेतो त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. यात ‘कॉर्पोरेट’ असण्याने काही फरक पडत नाही, असे आपल्याला वाटत असल्याचे केणी यांनी स्पष्ट केले.

मराठी चित्रपटनिर्मितीत नवनवीन निर्मिती संस्थांचे येणे ही चांगलीच गोष्ट आहे. कधीकधी छोटे निर्मातेही चांगले चित्रपट बनवतात पण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची क्षमता नसते, अशावेळी निर्मिती खर्चापासून ते वितरणापर्यंत वेगवेगळे पर्याय या निर्मिती संस्थामुळे उपलब्ध होतात, ही एक बाजू झाली. मात्र यामुळे बाजारपेठेच्या क्षमतेपेक्षाही जास्त चित्रपट निर्मिती होत असल्याची भीती ‘एव्हरेस्ट’च्या संजय छाब्रिया यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी १०२ मराठी चित्रपट आले. त्यातील फक्त १५ चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क विकले गेले आहेत. याचाच अर्थ सगळ्याच मराठी चित्रपटांना वसुलीसाठी चित्रपटगृहांच्या कमाईवर अवलंबून राहावं लागतं आहे हे वास्तव आहे. आणि वर्षांला शंभरच्यावर चित्रपट, आठवडय़ाला दोन-तीन चित्रपट प्रदर्शित झाले तर तेवढा मोठा प्रेक्षक अजूनही मराठी चित्रपटांना नाही, असे छाब्रिया यांनी सांगितले. त्यामुळे सध्या चित्रपटनिर्मितीचा खर्च मर्यादित ठेवून, दर्जेदार चित्रपट निर्मितीवर भर दिला तरच या गर्दीचा फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन छाब्रिया यांनी केले.  ‘कॉर्पोरेट’पेक्षाही मोठय़ा आणि स्वतंत्र निर्मिती संस्थांचा मोहरा मराठी चित्रपट निर्मितीकडे वळला आहे. त्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मात्र दर्जेदार आशयात्मक चित्रपटांची निवड, प्रेक्षकांचा प्रतिसाद अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून चित्रपट निर्मितीचे गणित साधले तरच ते मराठी चित्रपट व्यवसायाच्या वृद्धीसाठी पूरक ठरेल.

निर्मिती खर्च वाढण्याची भीती?

मराठी चित्रपट निर्मितीत नवनवीन मंडळी आली तर व्यवसाय वाढायला निश्चितच मदत होईल. प्रेक्षक आपल्याकडे खेचले जातील आणि मुख्य म्हणजे हिंदीसमोर उभं राहण्यासाठी मराठी चित्रपटांची एक ताकद असायला हवी ती यामुळे वाढेल. मात्र, मोठमोठय़ा निर्मिती संस्था विशेषत: कॉर्पोरेट्समुळे चित्रपट निर्मितीचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढण्याची शक्यता ‘झी स्टुडिओ’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी बोलून दाखवली.

निर्माते आणि दिग्दर्शक दोघांच्याही दृष्टीने हे फायद्याचे!

२०१० पासून मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा जोर धरायला सुरुवात केली. तेव्हाही दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या शंभर चित्रपटांपैकी पाचच चित्रपटांना चांगला व्यवसाय करता आला. मात्र, त्या पाच-पंधरा चित्रपटांनाही चांगला प्रेक्षकवर्ग आहे हे कॉर्पोरेट निर्मात्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही आणि आता तर मराठीत आशयात्मक चित्रपटांनाही चांगले यश मिळते आहे. याचा फायदा निर्माता आणि दिग्दर्शक दोघांनाही होणार आहे.  १०० चित्रपटांपैकी ९० चित्रपटांच्या निर्मात्यांना आपल्या चित्रपटाचं काय करायचं? याची समज नव्हती. बरेचसे जण केवळ पैसे आहेत म्हणून गुंतवणूक करणारे होते, त्यामुळे चांगला चित्रपट असूनही मार्केटिंगअभावी ते चित्रपट फसायचे. नवीन दिग्दर्शकांना आपले चित्रपट चांगल्या निर्मिती संस्थेच्या हातात पडणे ही गरज वाटू लागली होती आणि त्याच वेळी हे मोठे निर्माते दर्जेदार चित्रपटांच्या शोधात होते. आता ते दोघेही एकत्र आले असल्याने नक्कीच दर्जेदार चित्रपटांचा टक्का वाढेल. हिंदीतील निर्मात्यांना चांगले मराठी चित्रपट मिळतील जे पुढे हिंदीतही रिमेक होऊ शकतील आणि मराठी दिग्दर्शकांना आपला चित्रपट थेट प्रेक्षकोंपर्यंत पोहोचेल, याची हमी मिळेल त्यामुळे दोघांच्या दृष्टीने ही सुवर्णसंधीच आहे.

रवी जाधव, दिग्दर्शक