शहरातील देवळाली कॅम्प भागात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना करारनामा केलेल्या जागेच्या व्यवहारात याचिकाकर्त्यांने घेतलेल्या आक्षेपांवरून वाडकर यांच्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश येथील न्यायालयाने पोलीस यंत्रणेला दिले आहेत. जागेचा हा व्यवहार प्रारंभी संयुक्तपणे करण्याचे निश्चित झाले होते. परंतु, ऐनवेळी आपणास डावलून वाडकर यांनी फसवणूक केल्याची तक्रार हेमंत कोठीकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने वाडकर यांच्यासह करारनामा करून देणारे विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
वाडकर यांच्या जागा खरेदीचा विषय मागील तीन ते चार वर्षांपासून गाजत आहे. मध्यंतरी शासकीय यंत्रणेच्या कार्यशैलीविषयी उद्वेग व्यक्त करत वाडकर यांनी देश सोडून राहिलेले बरे, असे विधानही केले होते. वाडकर यांनी खरेदी केलेल्या जागेच्या व्यवहाराची पोलीस यंत्रणेने सखोल छाननी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात कोठीकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
देवळाली कॅम्प येथील जागा वाडकर, सोनू निगम व आपण संयुक्तपणे खरेदी करणार होतो. त्याबाबतचा करारनामा झाल्यावर या जागेवर इतरही काही जणांनी आपले हक्क सांगितले. व्यवहारातील क्लिष्टता पाहून निगम व्यवहारातून बाहेर पडले. पुढील काळात वाडकर यांनी धोपावकर व करंदीकर यांना हाताशी धरून परस्पर हा व्यवहार पूर्ण केल्याची तक्रार कोठीकर यांनी केली. या जागेबाबत करारनामा करण्याचे धोपावकर व करंदीकर यांना अधिकार नसताना ही प्रक्रिया पार पाडली गेली, असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा