प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेता आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर अन्य काही महिलांनीही त्यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांनंतर आलोक नाथ यांनी विनता नंदाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याबरोबरच आलोक नाथ यांची पत्नी आशु सिंह यांनी विनता यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून अवघा एक रुपया मागत न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु दिंडोशी न्यायालयाने आशु सिंह यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.

‘विनता नंदा यांना प्रसार माध्यमासमोर बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालता येणार नाही. त्या प्रसारमाध्यम, सोशल मीडिया किंवा अन्य कोणत्याही ठिकणी त्याचं मत, विचार मांडू शकतात’, असं म्हणत न्यायालयाने आशु यांची याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, ‘तारा’ मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आलोक नाथ यांनी घरी सोडण्याचं निमित्त करत माझ्यावर बलात्कार केला. या धक्क्यातून सावरणं फार कठीण होतं. परंतु आजच्या मुलींना आवाज उठविणं गरजेचं आहे, असं म्हणत विनता नंदा यांनी सोशल मीडियावर आवाज उठविला होता. याप्रकारानंतर सोशल मीडियावर आलोक नाथ यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

 

Story img Loader