दिग्दर्शक विक्रम भट यांचा ‘क्रिचर’ हा आगामी चित्रपट ‘ज्युरासिक पार्क’शी मिळताजुळता आहे.  ‘जुरासिक पार्क’ हा विशालकाय डायनासोरवरचा हॉलिवूड चित्रपट होता.  अशाप्रकारच्या विशालकाय जिवांवर बनविण्यात आलेला ‘क्रिचर’ हा भारतातील पहिला चित्रपट आहे. भारतात विशालकाय डायनासोर अथवा अशाच प्रकारच्या अन्य जिवांवर कधीही चित्रपट बनविण्यात आलेला नाही. ‘क्रिचर’ हा चित्रपट ‘ज्युरासिक पार्क’सारखा असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘प्रसाद लॅब्स’ने केली असून, हा चित्रपट थ्री डी आयमॅक्समध्ये उपलब्ध होणार आहे.
 १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला आणि स्टिव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ‘ ज्युरासिक पार्क’ हा अमेरिकन सायन्स फिक्शन प्रकारातला चित्रपट होता. चित्रपटाची कथा कोस्टा रिका प्रशांत महासागराच्या तटाजवळील इस्ला नुबलर नावाच्या काल्पनिक द्विपावर घडते. एक परोपकारी अरबपती आणि जेनेटीक वैज्ञानिकांची टीम  डायनासोरचे क्लोन करून या द्विपावर एका वन्यजीव उद्यानाचे निर्माण करतात, असे यात दाखविण्यात आले आहे. भयानक आणि विशालकाय जिवांचे अस्तित्व असणा-या एका भयानक जंगलात ‘क्रिचर’चे चित्रिकरण केले जाणार आहे.
चित्रपटात बिपाशा बसू प्रमुख भूमिकेत असून, बिपाशा आणि विक्रम तिस-यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘राज’, ‘राज-३’ या चित्रपटांमध्ये बिपाशा आणि विक्रमने एकत्र काम केले आहे. चित्रपटाचे शुटींग उटीमध्ये सुरू होणार असून, याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader