मुंबई : ‘यापुढच्या काळात आम्ही नाटकवाल्यांनी आपल्या कामातून प्रेक्षकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशांत दामले आणि भरत जाधव यांच्यासारखे रंगभूमीशी निष्ठा असलेले विश्वासार्ह कलाकार भविष्यात तयार व्हायला हवेत. तरच मराठी रंगभूमीचे भवितव्य उज्ज्वल राहील’, असा विश्वास लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अद्वैत दादरकर यांनी व्यक्त केला. ‘आमचे उद्याचे नाटक : व्यावसायिक रंगभूमी’ या परिसंवादात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या मुंबई विभागीय टप्प्यानिमित्त हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात लेखक नीरज शिरवईकर आणि नेपथ्यकार संदेश बेंद्रे हेही सहभागी झाले होते. मुग्धा गोडबोले यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. संतोष पवार, केदार शिंदे आणि देवेंद्र पेम यांनी काही काळ मराठी रंगभूमी तगवली हेही यावेळी दादरकर यांनी मान्य केले. व्यावसायिक रंगभूमीवर व्यवसायाची गणिते आखून जशी नाटके काढली जातात, त्याचप्रमाणे ‘सं. देवबाभळी’ आणि ‘अस्तित्व’सारखी प्रयोगशील नाटकेही मुख्य धारेत होतात, असे सांगून सहभागींनी मुख्य धारा रंगभूमी म्हणजे फक्त धंदेवाईक रंगभूमी हा समज खोटा असल्याचे सांगितले.

नीरज शिरवईकर यांनी आपण मागणीनुसार काही नाटके लिहिली हे मान्य केले, परंतु त्याचबरोबर नाटक लिहित असताना काही फॉर्म्युला माझ्यासमोर नसतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले. अर्थात, मुख्य धारा रंगभूमीच्या मर्यादा आणि अडचणी लक्षात घ्याव्याच लागतात हेही त्यांनी कबूल केले. जो तो आपल्या पिंडप्रकृतीप्रमाणे लिहितो, असे अद्वैत दादरकर म्हणाले. माझ्यावर संगीत रंगभूमी आणि व्यावसायिक नाटकांचेच संस्कार झाले असल्याने त्याच मानसिकतेतून माझे नाटक प्रसवते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य तयार करताना नाट्यगृहांच्या मर्यादांचे भान आपल्याला ठेवावे लागते असे सांगून निर्मात्यांची गणितेही नेपथ्य करत असताना सांभाळावी लागतात हे स्पष्ट केले. तरीही त्यातल्या त्यात वेगळे काय करता येईल हे मी पाहत असतो असे ते म्हणाले. भविष्यात नाटक टिकवायचे असेल तर बालनाट्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे; ज्यातून उद्याचे कलावंत आणि प्रेक्षकही घडतील असे मत त्यांनी व्यक्त केले.