‘अरे.. यार वोह कल का बच्चा रणबीरभी मुझे मात दे रहा है..’ शाहरूख, आमिर, हृतिक, रणबीर आगगाडीच्या डब्यांसारखी वाढत जाणारी नावे मोजून दमलेला सलमान खान..
एकीकडे यशराजचा हात सुटल्यावर निदान रुळावरून धावणारी गाडी चुकू नये म्हणून धावत एक एक डब्बा मागे टाकत पार ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या पहिल्या डब्यात उभ्या असणाऱ्या रोहित शेट्टीचा हात धरून गाडी पकडणारा शाहरूख खान..
आणि अरे, त्या गाडीत मी नाही आता बाइकवरून तिचा पाठलाग करून त्यांना मागे टाकू शकेन का?, असा विचार करत आपल्या टेन्शनचा सिगारेटच्या धुरातून निचरा करणारा आमिर खान..
हिंदी चित्रपटसृष्टीतील या ‘खाना’वळीची या वर्षी बरीच दमछाक झाली आहे ती तिकीटबारीची ‘कोटी कोटी’ रूपे पाहून.. आजवर या मंडळींनी चित्रपट केले, बक्कळ पैसे घेतले आणि दुसऱ्या चित्रपटाकडे वळले. पण, एवढय़ावरच ते थांबते तर नवल नव्हते. त्यांनी आपापली दुकाने सुरू केली. मी सहनिर्मिती करणार, म्हणजे मुख्य भूमिकाही माझी आणि नफ्यातला वाटाही माझा.. मला मानधन नको. कॉर्पोरेट निर्मातेही या अटीवर सॉल्लिड खूश! कारण, चित्रपटाचा हीरोच निर्माता म्हणजे मग प्रसिद्धीसाठी त्याला कुठेही फिरवा तो फिरणारच.. शेवटी त्याला त्याचा चित्रपट विकायचाय. पण, आपल्या फायद्यासाठी या मंडळींनी सुरू केलेला हा व्यवहार, त्याला नानाविध प्रसिद्धीतंत्रांची मिळालेली जोड यामुळे चित्रपट किती चांगला आहे? अभिनय, तंत्रकुशलता, दिग्दर्शन सगळ्याच सर्जनशील गोष्टी आउट झाल्या आहेत. उरले आहेत ते आकडे. या वर्षी प्रत्येक चित्रपटागणिक वाढत जाणारे हे कोटी.. कोटीचे आकडेच बॉलिवूडचे खरे ‘हीरो’ ठरले आहेत.
२०१३ मध्ये सलमान खानच्या चित्रपटांनी २०० कोटींचा गल्ला जमवला होता तरीही ते वर्ष सरता सरता शंभर कोटी म्हणजे खूप झाले, असेच काहीसे गणित होते. या वर्षी मात्र शंभर कोटी पार करायचेच या चढाओढीने चित्रपटांचे मार्केटिंग केले गेले आणि त्याचा परिणामही तसाच झाला. मोठय़ा चित्रपटांनी शंभर कोटी पार के ले तर छोटय़ा चित्रपटांनी पन्नास ते शंभर कोटींच्या घरात उडी घेतली. त्यामुळे आता नवीन वर्षांच्या संध्येला ही कलाकार मंडळी कुठेही मौजमजा करत असली तरी पुढच्या वर्षीसाठी २०० कोटींचा संकल्प करूनच नव्या वर्षांत बॉलिवूडमध्ये परततील..
या वर्षी शाहरूखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ कमीतकमी दिवसांत २०० कोटी पार करणारा पहिला चित्रपट ठरला. त्यामुळे शाहरूख आपोआप दोनशे कोटी क्लबमध्ये दाखल झाला. ‘क्रिश ३’ मुळे हृतिकही दोनशे कोटींमध्ये दाखल झाला, पण दुर्दैवाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड त्याला मोडता आला नाही जी संधी आमिरच्या ‘धूम ३’ने वर्षांच्या अखेरीस येऊन साधली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’लाही मागे टाकत केवळ चार दिवसांत २०० कोटींच्या वर कमाई करत पुन्हा एकदा आमिरने आपले वर्चस्व या वर्षी सिद्ध केले.
शंभर कोटी क्लबमधली गर्दी
मात्र, या वेळी शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटामुळे फरहान अख्तर, ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटामुळे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण, ‘रेस २’मुळे सैफ अली खान, आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर गेली दोन र्वष चित्रपटसृष्टीत पाय रोवायच्या प्रयत्नात होते, पण त्यांची दखलही क ोणी घेतली नव्हती. मात्र, एक ‘आशिकी २’ आला आणि शंभर कोटींचा धंदा काय करून गेला हे दोघेही आजच्या घडीला ‘स्टार’ म्हणून ओळखले जात आहेत. हीच कहाणी आनंद एल. राय यांच्या ‘रांझना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या धनुषचीही आहे. धनुष हा बॉलिवूडच्या शंभर कोटी क्लबमधला पहिला दाक्षिणात्य अभिनेता ठरला आहे. या सगळ्या भाऊगर्दीत आश्चर्यचकित करणारी एंट्री आहे ती ‘ग्रँड मस्ती’ची. अॅडल्ट कॉमेडी प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई करावी, हे कोडे चित्रपटाच्या निर्मात्यांनाही सुटलेले नाही..
एकमेव दीपिका!
२०० कोटी क्लबमध्ये दाखल झालेली बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण हे या वर्षीचं एकमेव यशस्वी उदाहरण म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे या वर्षी ‘रेस २’, ‘यह जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘गोलियों की रासलीला. रामलीला’ असे सलग चार सुपरहिट चित्रपट दीपिकाच्या नावावर आहेत. यात ‘चेन्नई एक्स्प्रेस’ २०० कोटी आणि बाकीच्या तिन्ही चित्रपटांची कमाई शंभर कोटींच्या वर आहे. पण, ‘रामलीला’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या दोन्हींच्या यशात दीपिकाची महत्त्वाची भूमिका आहे. किंबहुना, तिने मिळवलेल्या यशामुळे पुन्हा एकदा अभिनेत्रींची सद्दी बॉलिवूडमध्ये सुरू होईल, असा एक भाबडा का होईना विश्वास सगळ्यांनाच वाटू लागला आहे. अर्थात, वर्षांच्या शेवटी का होईना कतरिनाही ‘धूम ३’मुळे दोनशे कोटी क्लबमधली आपली जागा टिकवून आहे.
छोटय़ांचा मोठा धक्का!
छोटे कलाकार (म्हणजे छोटय़ा पडद्यावरचे कलाकार), छोटय़ा बजेटचे पण चांगल्या आशयाच्या चित्रपटांनी या वर्षी बॉलिवूडला मोठा धक्का दिला आहे. छोटय़ा पडद्यावरचा सुशांत सिंग राजपूत नावाचा चेहरा या वर्षी चांगलाच मोठा झाला आहे, अगदी शेखर कपूरचा चित्रपट मिळवेल इतका मोठा. सुशांतला ही किमया साधून देणाऱ्या ‘काय पो चे’ या सर्वार्थाने वेगळ्या चित्रपटाने तिकीटबारीवरही कमाल साधली आहे. फरहान अख्तरची निर्मिती असलेला ‘फुकरे’, यशराजचा ‘मेरे डॅड की मारुती’, रेमो डिसुझाचा ‘एनीबडी कॅन डान्स’, अर्शद वारसीचा ‘जॉली एल.एल.बी.’, कुणाल खेमू आणि सैफ अली खानचा ‘गो गोवा गॉन’, अक्षय कुमारचा ‘स्पेशल २६’ आणि छोटा नसला तरी आशयात्मकदृष्टय़ा दर्जेदार असणारा विक्रमादित्य मोटवने दिग्दर्शित ‘लुटेरा’ या चित्रपटांनी चांगली कमाईही केली आणि मोठय़ांच्याही चर्चेतले चित्रपट ठरले.
१०० कोटींचे चित्रपट
यह जवानी है दिवानी १८५.८३ कोटी
रामलीला ११३ कोटी
भाग मिल्खा भाग १०८ कोटी
रेस २ १०४ कोटी
ग्रॅंड मस्ती १०२ कोटी
रांझना १०० कोटी
कोटी कोटी रुपे तुझी..
‘अरे.. यार वोह कल का बच्चा रणबीरभी मुझे मात दे रहा है..’ शाहरूख, आमिर, हृतिक, रणबीर आगगाडीच्या डब्यांसारखी वाढत जाणारी नावे मोजून दमलेला सलमान खान..
![कोटी कोटी रुपे तुझी..](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/12/RV041.jpg?w=1024)
First published on: 29-12-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crore club bollywood movies