मराठी नाटकधंदा हा विनोदी नाटकांवरच चालतो असा बहुसंख्य निर्मात्यांचा समज आहे. ‘सेफ गेम’ खेळायचा तर विनोदी नाटक केलेलं बरं असं त्यांना वाटतं. त्यामुळे विनोदी कलाकारांना घेऊन नाटक काढलं की पैसे वसूल होतात, या गृहितकावर आजही नाटकं काढली जातात. सध्या मराठी रंगभूमीवर गुणी विनोदी कलाकारांचा सुकाळू असल्यानं निर्मात्यांनाही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. दिगंबर नाईक हे अशा कलाकारांपैकी एक. मच्छिंद्र कांबळींच्या पश्चात मालवणी नाटकांची धुरा खांद्यावर घेणारे दिगंबर नाईक हे तसे हरहुन्नरी कलावंत आहेत. मालवणी मुलखातला हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता, विनोदाची उत्तम जाण (अन् भानही), गाण्याचं पोटापुरतं अंग, चतुरस्र अभिनय या शिदोरीवर त्यांनी आपलं असं स्थान आज निर्माण केलं आहे. त्याचा लाभ उठवत ‘कट टू कट’ हे प्रवीण शांताराम लिखित आणि प्रभाकर मोरे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आणलं गेलं आहे. दिगंबर नाईकांची पंचरंगी भूमिका हेच या नाटकाचं प्रमुख आकर्षण आहे.
नाटकाचा विषय तसा बेतीवच आहे. त्यामुळे त्यात अनेक अतक्र्य गोष्टी ठासून आहेत. एकेकाळी संगीत रंगभूमीवर काम करणारे कुणी अण्णासाहेब नामक गायक नट अभिनय पेशातून निवृत्ती स्वीकारल्यावर समाजसेवेकडे वळतात. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलनं करणाऱ्या अण्णासाहेबांचा सरकारतर्फे २५ लाखांची थैली देऊन सत्कार करण्यात येतो. त्यांचा मुलगा मोहन घराचं कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे त्यातले काही पैसे मागतो.
..अण्णांच्या सत्कारानंतर अगदी डिट्टो मोहनचाच चेहरामोहरा असणारा कुणीतरी अण्णासाहेबांचा खून करण्यासाठी नाना वेशांत त्यांच्या घरी येऊ लागतो. सुरुवातीला अण्णांना आपला मुलगा मोहन हाच पैशांसाठी आपल्या जीवावर उठलाय असं वाटतं. प्रकरण पोलिसांत गेल्यावर मोहनला अटक होते. परंतु तरीही अण्णांचा जीव घेण्याचे प्रयत्न सुरूच राहतात. त्यामुळे अण्णा बुचकळ्यात पडतात. मोहनसारखाच हुबेहूब दिसणारा दुसराच कुणीतरी आपला खून करण्यासाठी टपलाय, हे तेव्हा अण्णांच्या लक्षात येतं.
कोण असतो तो? अण्णांचा जीव घेऊन त्याला काय मिळवायचं असतं? त्याचा प्रयत्न सफल होतो का?.. या प्रश्नांची उत्तरं ‘कट टू कट’ नाटकाच्या शेवटी मिळतातही; परंतु त्यानं आपलं पुरेसं समाधान होत नाही.
लेखक प्रवीण शांताराम यांनी हे बेतलेलं नाटक दिगंबर नाईक या नटाला समोर ठेवूनच लिहिलेलं आहे हे स्पष्ट आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका हाच या नाटकाचा ‘यूएसपी’ आहे. यात संगीत रंगभूमीवरील नट अण्णासाहेब निवृत्तीनंतर समाजसेवा करतात म्हणजे काय करतात, तर लोकांच्या ‘कथित’ प्रश्नांवर मोर्चे, धरणे, सत्याग्रह यासारखी आंदोलनं करतात. ते फारशा गांभीर्यानं हे करतात असं बिलकूल नाही. कुणा बोंबलेमहाराजांच्या कच्छपि लागलेले अण्णासाहेब रिकामपणाचा वेळ घालवण्यासाठी हे उद्योग करीत असतात. सरकारविरुद्ध एक मोर्चा काढण्याचं ठरत असतानाच मंत्रालयातून त्यांना फोन येतो आणि त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना २५ लाखांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे कळल्याबरोबर ते तो मोर्चा चक्क रद्द करतात. आता बोला! बरं, हे सारं नाटकात उपहासगर्भ शैलीत येतं असंही नाही. अत्यंत हास्यास्पद रीतीनं ते नाटकात मांडलं आहे. स्वाभाविकपणे प्रश्न असा पडतो की, या नाटकात लेखकाला नक्की काय मांडायचंय? नाटकाच्या शेवटाकडे अण्णांच्या खुनाच्या रहस्यमय प्रयत्नांबद्दल लेखकानं जी उकल केली आहे ती काहीशी पटली तरी सूडाने पेटलेल्या त्या तरुणानं निवडलेला मार्ग मात्र अतक्र्यच वाटतो. नाटकभर विनोदनिर्मितीचे लेखकाचे सायास कधी जमून गेलेत, तर कधी त्याबद्दल त्यांची कींवही करावी वाटते. मोहनने आपल्या बायकोवर- आशावर केलेले विनोद तर घासून गुळगुळीत झालेले आहेत.चित्रविचित्र पात्रं आणि त्यांचे वर्तन-व्यवहार यांतून विनोदनिर्मितीचे लेखकाचे प्रयत्न काही अंशी सफल झाले आहेत. उल्लेख करायचाच झाला तर पोलीस ठाण्यातील चौकशीच्या हास्यस्फोटक प्रसंगाचा करता येईल. परंतु तोही नको इतका ताणलेला आहे.
दिग्दर्शक प्रभाकर मोरे यांनी संहितेबरहुकूम प्रयोग सुविहित बसवला आहे. त्यांनी दिगंबर नाईक यांना मुक्तपणे बागडायला मोकळीक दिली आहे. (ते स्वाभाविकही आहे.) अर्कचित्रात्मक पात्रांकडून विनोद घडवण्यातही ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. अर्थात या पात्रांमध्ये कसलेही नावीन्य नाही. पूर्वीच्या नाटकांतून असली पात्रं हमखास आढळत. तांत्रिक बाबी ठाकठीक.
दिगंबर नाईक यांनी मोहनसह निरनिराळ्या भूमिकांत वैविध्य दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. विशेषत: स्वित्झलांजा हे स्त्रीपात्र रंगवताना स्त्रीचे नैसर्गिक हावभाव त्यांनी छान दर्शविले आहेत. त्याचबरोबर सरळमार्गी मोहन आणि बापाच्या कृत्यामुळे सूडाने पेटलेला तरुण या टोकाच्या भावना त्यांनी एकाच वेळी सहजगत्या आविष्कृत केल्या आहेत. इतर भूमिकांचं बेअरिंगही त्यांनी छान पेललं आहे. सुरेश चव्हाण यांनी दांभिक समाजसेवक अण्णासाहेब आवाजी आकांडतांडवाने अधिकच हास्यास्पद केला आहे. स्वप्ना साने यांनी टिप्पिकल सून (आशा) ठाशीवपणे केली आहे. तिचा घोटाळेबाज भाऊ सूर्यकांत- मयूर पवार यांनी त्याच्या नाना करामतींनिशी छान वठवला आहे. आपल्या वाटय़ाचे हशे ते वसूल करतात. तृषाली चव्हाण (उषा), हरेश मयेकर (बाबू आनंद हळूचकर), कमलाकर बागवे (हवालदार) आणि प्रभाकर मोरे (इन्स्पेक्टर चपले) यांनीही आपल्या भूमिका चोख केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा