गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांच्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिम्मा, झोंबिवली, टाइमपास ३, पावनखिंड, शेर शिवराज यासारखे विविध चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता येत्या शुक्रवारी १९ ऑगस्टला दगडी चाळ २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘चुकीला माफी नाही’ यांसारखे अनेक सुपरहिट डायलॉग असलेला दगडी चाळ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दगडी चाळ २’ च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांना मराठी चित्रपट, प्राईम टाइम आणि शो याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी फार स्पष्टपणे भाष्य केले.
“हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी…” मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने सुमीत राघवन संतापला
अभिनेता अंकुश चौधरी याला मराठी चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याला अचानक शो कमी करणे किंवा प्राईम टाईम न मिळणे याबाबत विचारण्यात आले. त्यावर अंकुश चौधरी म्हणाला, “प्रत्येक माणूस हा पुढच्या शुक्रवारी कोणता चित्रपट पाहायचा हे ठरवत असतो. ते आपल्या हातात नसतं. आपण त्याला तो चित्रपट पाहण्यासाठी कसे प्रवृत्त करु, त्याला आकर्षित कसे करु हे आपल्याकडे असते. आपल्या हातात फक्त चांगले काम करणे हे आहे. आम्ही चांगलं काम केले तरच लोक ते पाहण्यासाठी येणार. त्यामुळे आम्ही चांगलं काम करत राहू आणि त्यांचं काम ते करतील.”
त्यापुढे मकरंद देशपांडे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. “सर्वच संघटना, कलाकार यावर बोलत आहेत. चित्रपटगृहाच्या मालकांना याबाबत सांगत आहेत. मग त्यांचा उलटा वाद असतो, आम्ही पाटी लावतो, पण मग तितके प्रेक्षक आणून दाखवा. त्या वादावर काहीही बोलण्यासारखे नाही. पण जेव्हा एखादा चित्रपट चांगला चालत असतो. त्याला बंद पाडले जाते ते चुकीचे आहे. पण आता ते होईल, असे मला तरी आता वाटत नाही. ‘दगडी चाळ’ चालला आणि त्यावेळी एखादा हिंदी चित्रपट आला, तर त्याचे शो कमी होणार नाही”, असे मकरंद देशपांडे म्हणाले.
दरम्यान चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी केली आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार याची माहिती अद्याप समोरआलेली नाही. मात्र या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.