दिग्दर्शक हबीब फैसल यांचा ‘दावत-ए-इश्क’ हा तिसरा चित्रपट असला आणि आकर्षक शीर्षक चित्रपटाला दिले असले तरी अनिष्ट हुंडा प्रथेला स्पर्श करण्यापलीकडे प्रेमकथापट साकारण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. अर्थात फक्त परिणिती चोप्रासाठी ही बेचव प्रेमकथा पचविता येऊ शकते.
गुलरेज कादरी ऊर्फ गुल्लू आणि तिचे वडील दोघे हैदराबादमध्ये मध्यमवर्गीय जीवन जगत आहेत. गुल्लूच्या वडिलांच्या भूमिकेतील अनुपम खेर उच्च न्यायालयात वरिष्ठ कारकून पदावर नोकरीला आहेत, तर गुल्लूच्या भूमिकेतील परिणिती चोप्रा ही अद्याप महाविद्यालयीन शिक्षण घेत असून एका बुटांच्या दुकानात अर्धवेळ सेल्सगर्ल म्हणून नोकरी करतेय. वडिलांच्या लेखी मुलीचे लग्न करून दिले की आपण सुटलो असे मनात असल्यामुळे गुल्लूसाठी दररोज वरसंशोधन करण्याच्या खटपटीत ते असतात. गुलरेज सुंदर दिसण्याबरोबरच आधुनिक विचारांची शहरी वातावरणात वाढलेली, इंग्रजी शाळेत शिकलेली हैदराबादी मुस्लीम तरुणी आहे. त्यामुळे हुंडय़ावरून वरपक्षाकडून नाकारले जाण्याला ती कंटाळली आहे. परंतु हुंडा देऊन लग्न लावणे ही प्रथा गुलरेझच्या वडिलांना मान्य आहे. रीतीप्रमाणे सगळे काही झाले पाहिजे या मताचे तेही आहेत. अमेरिकेत जाऊन फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेण्याचे गुल्लूच्या मनात आहे; परंतु पैशाअभावी ते शक्य नाही हेही ती जाणून आहे. हुंडा देण्यास तिचा विरोध आणि त्यामुळे लग्नाला होणारा विलंब यामुळे गुल्लूचे वडील वैतागले आहेत. यावर उपाय म्हणून गुल्लूला एक भन्नाट कल्पना सुचते.
विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटमार्फत श्रीमंत मुलगा पाहून लग्न करायचे आणि नंतर त्याला ४९८ अ या कलमाचा आधार घेऊन फसवायचे आणि समाजातील हुंडा मागणाऱ्या वरपक्षाच्या लोकांना धडा शिकवून पैसे घेऊन अमेरिकेत जायचे अशी योजना ती आखते. पापभीरू वृत्तीचे गुल्लूचे वडील ही योजना धुडकावून लावतात; परंतु नंतर तयार होतात आणि मग ते दोघे लखनौला जाऊन पोहोचतात. तिथे ही योजना यशस्वी होते की नाही, यावर हा चित्रपट बेतलेला आहे.
गुल्लू लखनौला पोहोचल्यावर वरसंशोधन करताना तिची भेट तारीक हैदरशी होते. लखनौमधील सुप्रसिद्ध कबाब आणि बिर्याणीचे हॉटेल असलेला तारीक गुल्लूच्या प्रेमात पडतो. विवाहालाही त्याची संमती आहे. तीन-चार दिवसांच्या सहवासाने गुलरेझही तारीकच्या प्रेमात पडते. केवळ नायकाचे बिर्याणी-कबाबचे हॉटेल आहे एवढय़ावरून नायिका त्याच्या प्रेमात पडते असे दाखविले असावे असे शीर्षकावरून प्रेक्षकाला वाटू शकते. परंतु चित्रपटाचा मूळ विषय हुंडाप्रथा कशी चुकीची असते हा आहे. मात्र लेखक-दिग्दर्शकाने गुलरेझच्या वडिलांची व्यक्तिरेखा सोडली तर नायक-नायिकेच्या व्यक्तिरेखा तद्दन खोटय़ा वाटाव्यात अशा रंगवल्या आहेत. लखनौमध्ये हॉटेलचा मालक असलेल्या नायकाला नायिका व तिच्या वडिलांच्या फसवेगिरीबद्दल पुसटशी शंकाही येत नाही असे दाखविणे हास्यास्पद म्हणावे लागेल. सर्व प्रमुख व्यक्तिरेखांचे लेखन बॉलीवूडच्या तद्दन खोटय़ा व तकलादू धारणेनुसार केले आहे. परिणिती चोप्राने आधुनिक विचारांची मुस्लीम तरुणी उत्तम साकारली आहे. चित्रपटाची पटकथा अशा पद्धतीने उलगडत जाते की प्रेक्षक फारसा गुंतणार नाही. त्यामुळे हा एक टाईमपास चित्रपट आहे. शीर्षकानुसार चित्रपट चटकदार नाही. त्यामुळे ही प्रेमकथा बेचव ठरते.
दावत-ए-इश्क
निर्माता- आदित्य चोप्रा
लेखक-दिग्दर्शक- हबीब फैसल
संगीत- साजिद-वाजिद
कलावंत- आदित्य रॉय कपूर, परिणिती चोप्रा, अनुपम खेर, सुमित गड्डी, करण वाही व अन्य.

Story img Loader