‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंजिल’ या अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांना ओळखले जाते. एकेकाळी त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. त्यांनी अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. १९५९ पासून ते १९७३ च्या काळात बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे.
आशा पारेख यांनी ६० ते ७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख यांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीही लावली होती. एकदा एका कार्यक्रमात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय दहा वर्ष होते. आशा यांचे नृत्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मां’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी १९५४ मध्ये त्यांनी बाप बेटी या चित्रपटात काम केले.
आणखी वाचा : “वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, पण….” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या डायलॉगची प्रेक्षकांना भूरळ
१९५९ मध्ये अभिनेते शम्मी कपूरसोबत दिल देके देखो या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आशा पारेख यांनी ९५ हून अधिक चित्रपटात काम केले. राजेश खन्ना, मनोज कुमार , सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केली होती. मात्र अचानक एकेदिवशी आशा पारेख यांनी सिनेसृष्टीला राम राम केला. त्यांनी स्वत: यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि त्यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सांगितले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
आणखी वाचा : Dadasaheb Phalke Award 2022 : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
आशा पारेख या एका चित्रपटात काम करत होत्या. त्यात त्यांच्यासोबत परवीन बाबी, कादर खान, प्राण, अमजद खान हे कलाकारही होते. पण आशा यांचे वय जसे जसे वाढत गेले, तसतसे त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर येणे कमी झाले. वाढत्या वयानुसार आशा यांना दुय्यम भूमिका मिळायच्या. एका चित्रपटात त्यांना आईच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती.
एका मुलाखतीत आशा पारेख म्हणाल्या, “मला आईची भूमिका करणे अजिबात आवडत नाही. पण एकदा काम नसल्यामुळे मी त्या पात्राला हो म्हटलं. त्यावेळी दिग्दर्शकाने मला सकाळी ९.३० वाजता पोहोचण्यास सांगितले. मी वेळेत पोहोचली. पण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार हे संध्याकाळी ६.३० वाजता सेटवर पोहोचले. मी या गोष्टीला फार कंटाळले होते. या त्रासाला कंटाळूनच मी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.”
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?
“माझ्यासाठी हा निर्णय घेणे फार कठीण होते. पण आयुष्यात सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्यापैकी हा एक होता. त्यावेळी मी ती गोष्ट स्वीकारली. मी म्हातारी झाली होती याचा मी स्वीकार केला”, असेही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान सिनेसृष्टीला रामराम केल्यानंतर आशा पारेख यांनी गुजराती मालिकांचे दिग्दर्शन केले. तसेच त्यांनी स्वत:च्या निर्मिती संस्थेतंर्गत पलाश के फूल, बाजे पायल, कोरा कागज आणि दाल में काला यांसारख्या मालिकांची निर्मिती केली.