अभिनेता अर्जुन रामपालचा आगामी ‘डॅडी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता बदलण्यात आली आहे. एक कुख्यात गुंड ते राजकारण्यापर्यंतचा अरूण गवळीचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. सुरुवातीला या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख २१ जुलै ठरवण्यात आली होती. पण आता अरुणच्या एका निर्णयाने सिनेमाची तारीखच दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. अरुण गवळीची मुलगी गीताने सांगितले की, कदाचित दोन महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये बाबा पॅरोलवर सुटू शकतात, त्यामुळे सिनेमा जर तेव्हा प्रदर्शित करण्यात आला तर तेही या सिनेमाचे प्रमोशन करु शकतात. या एका कारणासाठी निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखच बदलली.
आपल्या पालकांची लाज काढणाऱ्या तरुणाला अमिताभ यांनी सुनावले
गेल्या तीन वर्षांपासून या सिनेमावर काम करण्यात येत आहे. या सिनेमात गवळी कुटुंबियांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अरुण गवळीची मुलगी गीता या सिनेमासाठी फार उत्साही आहे. त्यामुळेच तिने तिच्या वडिलांची भेट घेऊन प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासाठी सांगितले.
गीताने मुलाखतीत सांगितले की, ‘मी या सिनेमाबाबत फारच उत्सुक आहे. प्रत्येकाने हा सिनेमा पाहावा असंच मला वाटतं. माझे बाबा जेव्हा तुरुंगातून बाहेर येतील तेव्हा जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर अजून आनंद होईल. त्यांना सप्टेंबरमध्ये पॅरोल मिळावा अशीच अपेक्षा सध्या मी करतेय. जगाने हा सिनेमा पाहावा आणि खरे डॅडी कसे आहेत हे सर्वांना कळावे अशी माझी अपेक्षा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते आमचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच सिनेमाचे प्रदर्शन व्हावे असे मला वाटते.’
याबद्दल अधिक बोलताना गीता म्हणाली की, ‘अर्जुन आणि दिग्दर्शक अशीम वालिआ यांनी या सिनेमात डॅडीच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टी दाखवल्या आहेत. बाबांना समोर पाहणं आणि मोठ्या पडद्यावर पाहणं यात खूप फरक आहे. गेल्या तीन वर्षांत अर्जुनने माझ्या बाबांना पूर्ण समजून घेतले. त्यांच्या मनातील भावना समजून घेऊन त्या उत्तम पद्धतीने त्याने सिनेमात उतरवल्या आहेत.’
‘द कपिल शर्मा शो’मध्ये जाण्यासाठी इरफान पठाण करतोय तरुणांना मदत
याशिवाय गीताने अजून एका कारणासाठी निर्मात्यांना सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यास सांगितली ती म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी हा सण अरुण गवळीच्या फार जवळचा आहे. या सणादरम्यान जर त्याच्या सिनेमाचे प्रदर्शन झाले तर ती गवळी कुटुंबियांसाठी फार आनंदाची बाब असणार आहे असे गीता म्हणाली.