टीव्हीवरील दैनंदिन मालिका म्हणजे सासू-सूनेची भांडणे, वादविवाद हे ठरलेलं समिकरण असतं. त्यात थोडी जागा मिळालीच, तर नणंद-जावेचे हेवेदावे, नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवेफुगवे यांची खमंग फोडणीही असतेच. पण या पलीकडे जाऊन आता मालिकांनी त्यांचा मोहरा वडील आणि मुलीच्या नात्यातील नवनवीन पदर उलगडण्यास सुरवात केली आहे. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या आणि नव्याने येत असलेल्या मालिकांची मध्यवर्ती संकल्पना वडील आणि मुलीच्या नात्याभोवती फिरताना दिसते आहे. मालिकांमध्ये नायिकेच्या करिअर निवडीपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक बाबीमध्ये तिच्या वडीलांची महत्त्वाची भुमिका बजावताना दिसत आहेत. त्यामुळे ‘घर का चिराग’ म्हणून नायकाला मिळणारे स्थान आता घरातील मुलीला मिळू लागले आहे.
नव्याने सुरु झालेल्या ‘असे हे कन्यदान’मध्येही गायत्री आणि तिच्या वडीलांमधील नाते उलगडण्यात आले आहे. लग्नानंतर दुरावणारी मुलगी आणि वडीलांची भावना यावर मालिकेची कथा अधारित आहे. याशिवाय ‘माझिया माहेरा’मध्येही वडीलांच्या इच्छेखातर तिने शासकिय क्षेत्रामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये सुरवातीला वडीलांच्या वागण्याचे मुलींवर होणारे परिणाम दाखविण्यात आले होते. दुर्वाच्या वडीलांच्या राजकिय महत्त्वाकांशेपोटी तिला तिच्या पसंतीविरोधात लग्न करावे लागते. अर्थात लग्नानंतरही तिचे वडील आणि सासरे यांच्यातील राजकिय घडामोडींचे पडसाद तिच्या आयुष्यावर पडताना दिसत होते. मालिकेची सुरवात मेघनाच्या वडीलांची तिच्यासाठी असलेली पराकोटीची काळजी आणि त्याचे तिच्या आयुष्यावर झालेले परिणाम यावर आधारित होती. मेघनाच्या लग्नानंतर त्यांच्या अंधश्रद्धाळूवृत्तीमुळे तिच्या संसारावर झालेले परिणाम मालिकेत अधोरेखित झाले होते.

एक वडील आणि मुलगी यांच्या नात्याला खुप विविध बाजू असतात, मालिकांमध्ये हे नाते उलगडण्याची पुरेशी संधी अजून मिळालेली नाही. प्रेक्षकांसाठी सतत काहीतरी नवीन घेऊन येण्याच्या शोधात या नात्याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यादृष्टीने या विषयावर मालिका करण्याचा निर्णय घेतला.
शशांक सोळंकी
निर्माता, असे हे कन्यादान

हिंदीमधील वडील आणि मुलगी
लवकरच सुरु होणाऱ्या ‘तेरे शहर में’मध्ये वडीलांच्या लाडाकोडात वाढलेली अमाया त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना आदर्श ठेवत स्वत:च्या कुटूंबाला सावरताना दिसणार आहे. दिल्लीचा सुलताना इल्तुमिशने मृत्यपूर्वीच मुलगी सुलताना रझिया साम्राज्याचा भार सांभाळण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्याच्या मुलीने भारताची पहिली मुस्लिम सुलतान बनून सार्थ ठरविला होता. या ‘सुलताना रझिया’ची कहानी लवकरच छोटय़ा पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘शास्त्री सिस्टर्स’ ही मालिका चार मुलींची जबाबदारी सांभाळणाऱ्या वडीलांच्या त्यांच्या मुलींशी असलेल्या नात्यावर आधारित आहे. सध्या गाजत असलेली ‘दिया और बाती हम’मधील संध्याने वडीलांनी तिच्यासाठी पाहिलेले आयपीएस ऑफिसर बनण्याचे स्वप्न पुर्ण त्यांच्या मृत्यूनंतरही पुर्ण करुन दाखविले.

Story img Loader