आयपीएलचे सामने संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून वेगवेगळ्या वाहिन्यांनी नृत्य रिअ‍ॅलिटी शो व अन्य नवीन कार्यक्रमांना सुरुवात केली. नृत्य रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाने आगळेवेगळे स्थान रसिकांच्या मनात निर्माण केले आहे. सध्या या कार्यक्रमाचे नवीन पर्व कलर्स वाहिनीवरून पाहायला मिळत आहे. शनिवारपासूनच सुरू झालेल्या या कार्यक्रमाकडे टीव्हीच्या प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी स्पर्धकांची ओळख आणि त्याविषयीचे प्रोमो दाखविण्याऐवजी कलर्स वाहिनीने यंदा भर दिलाय तो सेलिब्रिटी परीक्षक माधुरी दीक्षित आणि तिच्या नृत्यनैपुण्याला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या म्हणजेच रविवारच्याच भागात माधुरीचे नृत्य बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने माधुरीच्या नृत्याच्या जाहिरातींचा मारा करून प्रेक्षकाला कार्यक्रम पाहण्यासाठी खेचण्याची शक्कल लढवून कलर्स वाहिनीने यापुढेही कार्यक्रमाचा टीआरपी आणि जीआरपीचा आलेख सतत चढा ठेवण्याची नांदी केली आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नृत्यकार आणि कथ्थक नृत्याला जगभरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न करणारे नृत्यगुरू पं. बिरजू महाराज आणि त्यांचे शिष्य व माधुरी दीक्षित यांचे एकत्रित नृत्याविष्कार पाहण्याची संधी रसिकांना रविवारी मिळणार आहे. त्याचबरोबर पंडितजींसोबत माधुरीची स्वतंत्रपणे नृत्य जुगलबंदीही अनुभवायला मिळणार आहे.  पं. बिरजू महाराजांबद्दल बोलताना माधुरी सांगते की, सहा वर्षांची असताना पहिल्यांदा पंडितजींचा नृत्याविष्कार पाहिला. तेव्हापासून नृत्याबद्दलचे आकर्षण वाढत गेले. आता दस्तुरखुद्द पंडितजींसारख्या महान शास्त्रीय नृत्यकारासोबत नृत्य करण्याचा योग आलाय. त्याचे दडपणही होते. परंतु, झलक दिखला जाच्या मंचावरून पंडितजींचे नृत्य पाहून अनेकांना शास्त्रीय नृत्याचे महत्त्व समजेल आणि अनेकांना यातून प्रेरणा मिळेल, असेही माधुरीने म्हटलेय. पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली माधुरीने नृत्याचे धडे गिरविले त्याच्या आठवणीही माधुरी रविवारच्या भागात सांगणार आहे. कलर्स वाहिनीवर झलक दिखला जा कार्यक्रमाचा हा भाग रविवारी रात्री ९ वाजता पाहाता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा