‘डान्स दिवाने ३’ या शो चा यंदाच्या आठवड्यातील नवा एपिसोड काहीसा प्रेमाच्या माहोलने भरलेला असणार आहे. कारण या आठवड्याच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री रेखा स्पेशल गेस्ट बनून एन्ट्री करणार आहेत. ‘एवरग्रीन’ रेखा यांच्या एन्ट्रीमुळे ‘डान्स दिवाने ३’ चा मंच रोमान्सने फुलून जाणार आहे. त्यामुळे या शो च्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री रेखा चांगलीच मैफील रंगणावर हे मात्र नक्की. नुकतंच कलर्स टीव्हीने नव्या एपिसोडचे काही प्रोमो शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये अभिनेत्री रेखा शो मधील सर्व स्पर्धकांसोबत जबरदस्त डान्स आणि मस्ती करताना दिसून आल्या.
या शो मध्ये रेखा नेहमीप्रमाणेच आपल्या आयकॉनिक स्टाईलमध्ये दिसून आल्या असून त्यांनी ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केलेली होती. यावर त्यांच्या ज्वेलरीने त्यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसून आलं. यावेळी रेखा यांनी त्यांचा सुपरहिट चित्रपट ‘सिलसिला’ मधला स्पेशल सीन पुन्हा एकदा रिक्रिएट केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ‘सिलसिला’ या चित्रपटात जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा मुख्य भूमिकेत होते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा हा शेवटचा चित्रपट होता.
कलर्स टीव्हीने ‘सिलसिला’ चित्रपटातील रिक्रिएट सीनचा एक प्रोमो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या रिक्रिएट सीनमध्ये माधुरी दीक्षितने जया बच्चन यांची भूमिका केली आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन बनलेली माधुरी दीक्षित आणि रेखा एकमेकींकडे पाठ करत उभ्या राहिल्या आहेत. यावर जया बच्चन यांच्या रूपात माधुरी दीक्षित म्हणते, “काय हवंय तुला, त्यांचा नाद सोडून दे..” जया बच्चन यांचे डायलॉग म्हणत असलेल्या माधुरीला रेखा म्हणतात, “मला काय हवंय याने काय फरक पडतोय…त्यांना सोडणं हे माझ्या हातात नाही आणि जे माझ्या हातात नाही ते मी कसं करू शकते? ते माझं प्रेम आहे आणि ते प्रेम आता माझं नशीब बनलंय…” या डायलॉग नंतर बॅकग्राऊंडला ‘सिलसिला’ चित्रपटातलं एक गाणं सुरू होतं.
माधुरी दीक्षित आणि रेखा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर करत युजर्स सोशल मीडियावर रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना दिसून येत आहेत.