नृत्य हा एकूणच भारतीयांचा आणि पर्यायाने हिंदी चित्रपटांचा जीव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांमधून नृत्यदिग्दर्शकांच्याही पिढय़ा बदलत गेल्या असल्या तरी त्यांचे चेहरे हिंदी चित्रपटांमध्ये फारसे दिसत नाहीत. अर्थात वेगवेगळ्या वाहिन्यांवरून डान्स रिअॅलिटी नावाचे जे पीक आले आहे त्यात मात्र तेच तेच चेहरे सातत्याने झळकताना दिसतात. या पाश्र्वभूमीवर हिंदी चित्रपटांमधून हल्ली नृत्य हा प्रकारच गायब होऊ लागला आहे; इथपासून ते चित्रपटांमध्ये नावारूपाला येणाऱ्या ठरावीक नृत्यदिग्दर्शकांनाच संधी दिली जाते, नवीन नृत्यदिग्दर्शक मागेच राहतात किंवा रिअॅलिटी शोमधून काम करत राहतात, असे टीकेचे नानाविध सूर उमटू लागले आहेत. या दाव्यांमध्ये खरोखरच अर्थ आहे का? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
‘नृत्य’ हा भारतीय समाजजीवनाचा दुर्लक्षित न होऊ शकणारा महत्त्वाचा भाग आहे. नृत्य हे समाजजीवनाचेच महत्त्वपूर्ण अंग असल्याने त्याचा प्रवाह हा नाटक-चित्रपटांसह इतर अनेक माध्यमांमध्ये सहजरीत्या प्रवाहित झाला. भारतीय चित्रपट हे नृत्यविरहित असाल्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. याशिवाय, दूरचित्रवाणीवर नृत्यविषयक ‘रिअॅलिटी शो’ हा नवीन प्रवाह नृत्य सादरीकरणाच्या माध्यमात आल्याने एरवी नृत्य म्हटलं की नाकं मुरडणारी मंडळीही नृत्य पाहण्यात आणि ते जाणून घेण्यात रस घेऊ लागली. परंतु, यामध्ये रिअॅलिटी शोचा नवीन चमकदार प्रवाह मात्र नृत्यक्षेत्रात फार मोठा आणि न पचणारा बदल घडवतो आहे. पूर्वी चित्रपटात नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीला आदराने ‘डान्स मास्टर’ म्हटले जायचे. आजही जेष्ठ प्रथितयश नृत्यदिग्दíशका सरोज खान यांना आदराने ‘मास्टरजी’ असे संबोधले जाते. त्याकाळी चित्रपटातील नृत्यदिग्दर्शक केवळ आपल्या कामाच्या आणि गुणांच्या बळावर प्रसिद्धीच्या झोतात येत होते. आता मात्र याउलट झाले असून एखादा नृत्यविषयक रिअॅलिटी शो करून अनुभव नसलेला नृत्यदिग्दर्शकही अल्पावधीत प्रसिद्ध होतो आणि त्याला केवळ प्रसिद्धीच्या जोरावर काम मिळते. आणि मग अनेक वेळा तोच एक नृत्यदिग्दर्शक वेगवेगळ्या वाहिन्यांवरील रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला पाहायला मिळतो. त्यामुळे कित्येक वेळा या शोमधला परीक्षकांच्या खुर्चीतला तोच तोच पणा खटकायला लागतो. केवळ त्या एकाच चेहऱ्याला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा प्रयत्न आपल्याला सहज दिसून येतो.
नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये तोच तोचपणा येणे साहजिक आहे. या सगळ्याच कार्यक्रमांचा साचा हा एकसारखा असतो. कित्येकदा असंही होतं की प्रेक्षकांना एखाद्याच परीक्षकाचं मत देणं आवडू लागतं आणि त्यामुळे तो प्रसिद्ध होतो, शोचा ‘टीआरपी’ वाढतो. अशा परीक्षकाला निर्मात्यांक डून मागणी वाढली तर त्यात काही वावगे नाही. मात्र, आत्ताच्या नृत्यदिग्दर्शकांना चित्रपटांमधून काम नाही असे म्हणणे योग्य नाही. पूर्वी टीव्ही हे माध्यम प्रभावी नसल्याने चित्रपटातील ‘डान्स मास्टर’ यांना महत्त्व होते, पण आता ‘रिअॅलिटी शो’मधून येणारी नवीन पिढीही तितक्याच चांगल्या पद्धतीने काम करते आहे. तुम्ही नृत्यकलेत निपुण आहात म्हणजेच तुम्ही चांगले नृत्यदिग्दर्शक आहात, असे नाही. नृत्यदिग्दर्शकाच्या मागे हरहुन्नरी अशा साहाय्यक नृत्यदिग्दर्शकांची फौज असते त्यामुळे प्रत्येक वेळी नृत्यदिग्दर्शक हा प्रत्येक शैलीत निपुण असणे गरजेचे नाही. चित्रपटांमध्ये नृत्य बसवताना डान्स स्टेपपेक्षा तो ते गाणं कशा प्रकारे दिग्दíशत करतो याला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे कोणत्या प्रकारे कॅमेऱ्याचे अँगल लावून गाण्यात आणि शिकवलेल्या नृत्यात सुंदरता निर्माण केली जाते हे तिथे जास्त महत्त्वाचं ठरतं. तोही नृत्यदिग्दर्शकाच्या कौशल्याचा भाग आहे.
फुलवा खामकर
जो वेगळे काही करून दाखवेल त्याला हिंदी चित्रपटच काय अनेक माध्यमांमध्ये स्वत:हून बोलवलं जातं. मी स्वत: या इंडस्ट्रीत किती वर्षे काम करतो आहे. आमच्याबरोबर साहाय्यक नृत्यदिग्दर्शकांची एक मोठी टीम असते. हळूहळू ते शिकून त्यांचं स्वतंत्रपणे काम सुरू करतात. या इंडस्ट्रीत तुम्ही तुमचं काम कसं पुढे नेता?, याची प्रत्येकाची पद्धत, शैली वेगळी असते. रेमो डिसूझासारखा नृत्यदिग्दर्शक तोही साहाय्यक म्हणूनच एके काळी काम करत होता. आज त्याने त्याच्या कामाच्या बळावर स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून मर्यादित न राहता त्याने दिग्दर्शक बनण्याचंही स्वप्न पाहिलं. त्यामुळे नवीन नृत्यदिग्दर्शकांना हिंदी चित्रपटांत कामच नाही, तेच तेच नृत्यदिग्दर्शक पुढे येतात, या दाव्यांमध्ये काहीही अर्थ नाही. हिंदी चित्रपटांमधून गाणं आणि नाचणं दूर होणारं नाही. पण बदलत्या काळाबरोबर त्याच्या स्वरूपात होणारे बदल समजून घेऊनच काम केलं पाहिजे –
गणेश आचार्य
‘डान्स रिअॅलिटी शो’मध्ये परीक्षक म्हणून दिसणारे तेच तेच चेहरे हे वाहिन्यांचे अधिकारी आणि शोच्या निर्मात्यांमुळे दिसतात. नृत्यदिग्दर्शकाने परीक्षक म्हणून केलेल्या शोचा टीआरपी पाहून किंवा त्याची लोकप्रियता, त्याचा एक्स फॅक्टर पाहून मग निर्मात्यांकडून त्यांची निवड केली जाते. शिवाय, परीक्षकाच्या खुर्चीत बसणारा नृत्यदिग्दर्शक हा खरंच नृत्य क्षेत्रातला जाणकार असतो. त्याचा वर्षांनुवर्षांचा अनुभव आणि ज्ञान यामुळे तो त्या स्थानी असणं साहजिकही आहे, असं मला वाटतं. अनेकदा बऱ्याच ‘डान्स रिअॅलिटी शो’च्या बाबतीत तेच तेच नृत्यदिग्दर्शक परीक्षक म्हणून दिसताहेत हे लक्षात आल्यानंतर आधीच्या पर्वातील स्पर्धकांनाच परीक्षक म्हणून संधी दिल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शोजचा टीआरपी रेट हा स्पर्धकांच्या नृत्याबरोबरच त्यांना परीक्षकांनी दिलेली मते, त्या परीक्षकाचे शोमधले अस्तित्व, त्याचा इतरांवरचा प्रभाव यावर अवलंबून असल्यानेही त्यांची निवड काळजीपूर्वक केली जाते.
– वैभव घुगे