सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य अनेकजण म्हणताना दिसतात. तसंच गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमांना, डान्स शोजना मोठ्या प्रमाणावर गर्दीही होते. अशात प्रसिद्ध गायक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी गौतमी पाटीलच्या नाचावर टीका केली आहे. लावणी हा रुढ प्रकार गौतमी पाटीलने भ्रष्ट केला असं गणेश चंदनशिवेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली आहे.
तमाशा हा शब्द आपला नाही
“तमाशा हा शब्द आपला नाही, हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेतून तू फारसी भाषेत, तिथून उर्दूत आणि मग मराठीत येऊन रुढ झाला. तमासा असं म्हटलं जायचं. उत्तरेतून मोगल दक्षिणेत आले तेव्हा ते पेशे वगैरे पाहात असत. इकडे गंमत किंवा खेळ असं म्हटलं जायचं. मोगलांनी तमाशा हा शब्द आणला. तमाशा करो म्हटल्यावर लोकांनी वेगळाच अर्थ आहे. खरा अर्थ तमो गुणाचा जो नाश करतो त्याला तमाशा म्हणतात. तमाशाचा जन्मच निखळ मनोरंजनासाठी झाला आहे. कष्टकरी, शेतकरी यांना मनोरंजनाचं साधन नव्हतं तो संध्याकाळी तमाशा पाहण्यासाठी जात होता. जे तमाशाला नावं ठेवतात त्यांनी अण्णाभाऊ साठेंचे तमाशे पाहिले पाहिजेत, काळू बाळूचा तमाशा पाहिला हवा.”
रजतपटांमध्ये जो तमाशा आहे तो मूळ तमाशा नाही
रजतपटांमध्ये जो तमाशा पाहतो तो मूळ तमाशाच नाही. तमाशाची धाटणी अशी आहे की ज्यात गण आहे, गवळण आहे बतावणी आहे, लावण्या आहेत, कटाव आहेत, सवाल-जवाब आहेत अशा सगळ्या पद्धतीचा तमाशा वगाने संपतो. एक होता विदूषक या चित्रपटात काही अवशेष पाहण्यास मिळतात. बाकी एकाही तमाशापटात खराखुरा तमाशा हा दिसलेलाच नाही. नटरंगमध्ये ज्या लावण्या आहेत त्या लावण्यांना जो ढोलकीचा बाज आहे तो बाज दिलेला नाही. काही बारकावे आहेत आहेत. मध्यंतरी चंद्रमुखी सिनेमा आला होता, कादंबरी वेगळी आणि चित्रपट वेगळा असंच होतं. असं गणेश चंदनशिवे म्हणाले. कॅच अप नावाच्या युट्यूब चॅनलवर गणेश चंदनशिवे यांनी अमोल परचुरेंना मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं.
लावणी कुणामुळे भ्रष्ट झाली?
गौतमी पाटील आणि तिच्या नृत्यप्रकाराबद्दल बोलताना डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की,”मध्यंतरी गौतमी पाटीलसारखी मुलगी आली. मुळात गौतमी लावणी करत नसून आयटम साँग करते. लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली. ज्या लावणीमुळे एवढा मोठा इतिहास दिला आहे. त्या लावणीला कुठेतरी एक डाग लागल्यासारखा झाला. पुढे तिच्यावर टीका होऊ लागली तेव्हा तिने स्वत: मान्य केलं की ती लावणी करत नाही”.
लावणीला खूपप मोठी परंपरा आहे
“लावणीला मोठी परंपरा आहे. लावणीला शकुबाई, कोल्हापूरकर बाई, लक्ष्मी बाई, यमूना बाईंची परंपरा आहे. डोईवरचा पदर ढळू न देता सुलोचना बाईंनी रजत पटावर लावणी गायली आहे. तुम्ही आयटम साँग करताय, स्टेजवर एकदम पाण्याचे फवारे टाकताय, त्यात तुम्ही कसे दिसता याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं की अशीच परंपरा आहे. त्यातून आमच्यासारखे लोक मार्ग काढत चालले आहेत. मुंबईतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना मला सांगायचंय लावणी करा. परदेशातील मुलींना घेऊन लावणी केलीत तरी चालेल पण त्यात पारंपारिक फडावरील मुली असतील तर ते भरुन निघेल. लावणी कधी अर्धनग्न नाही. ती नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली आहे. तिची चोळी स्लिव्हलेस नाही. तिची पाठ दिसत नाही. तिच्या कंबरेला पट्टा असतो. कासोट्याचं तिचं पातळ आहे. पायात पाच-पाच किलोचे घुंगरू आहेत. ही लावणीची संस्कृती आपण जपली पाहिजे”. असंही गणेश चंदनशिवेंनी म्हटलं आहे.