बॉलीवूडध्ये गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंच्या जीवनावर बनलेले चित्रपट आपल्याला पाहावयास मिळाले. या खेळाडूंच्या ख-याखु-या आयुष्यातील ग्लॅमरस भागावर लक्ष केंद्रित करून त्यावर चित्रपट तयार करण्यात आले. हे आपल्याला ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या चरित्रपटांमध्ये पाहावयास मिळाले. जीवनपट बनविण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या आयुष्यात जो काही लढा दिला त्याला रुपेरी पडद्यावर अगदी भव्य स्वरुपात दाखविण्यात आले. इतकेच, काय पण मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात गीता फोगटचा लक्षणीय विजय असलेल्या सामन्यातील महत्त्वाची माहिती चुकीची देण्यात आली आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये गीता फोगटने खेळलेली कुस्ती ही चित्रपटातील महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटातील हे दृश्य पाहताना तुमच्या मनात देशभक्तीची भावना आल्यावाचून राहणार नाही. गीताने ती मॅच तेव्हा जिंकली होती. त्याचप्रमाणे चित्रपटात फातिमा सना शेखही विजयी झालेली दाखविली आहे. पण, यात एक मोठा फरक दाखविण्यात आला आहे. बहुदा आमिर आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी चित्रपटात केलेला हा बदल प्रेक्षकांची उत्सुकता ताणण्यासाठी केला असावा. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर चित्रपट बनवताना यात सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आल्याचे दिसून येते.

गीता फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळलेल्या मॅचचा व्हिडिओ पाहिलात तर त्यात तुम्हाला स्कोर १-०, ७-० असा दिसेल. याचा अर्थ शेवटपर्यंत या मॅचवर गीताचीच मक्तेदारी होती. तिने आपल्या प्रतिस्पर्धीला एकही गुण मिळवण्याची संधी दिली नव्हती. या ख-या मॅचप्रमाणे चित्रपटातही मॅच दाखविण्यात आली आहे. पण, यात गीताची भूमिका साकारणारी फातिमा ही मॅच ३-०, ४-६,६-५ अशी जिंकते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्यासाठी असे करण्यात आले असून शेवटपर्यंत त्यांची नजर कुठेही हलू नये याची पुरेपुर काळजी दिग्दर्शकाने घेतलेली दिसते.

‘दंगल’मध्ये घेण्यात आलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीविषयी बोलताना नितेश तिवारी म्हणालेली की, कोणताही चरित्रपट करायचा असेल तर सिनेमॅटिक लिबर्टी महत्त्वाची असते, कारण असं कुठलंच चरित्र नाही जे सर्वागाने सुंदर आहे आणि त्यातून एक व्यावसायिक चित्रपट सहज उभा राहील. जे घडलं आहे तेच अगदी दाखवायचं ठरलं तर तो मग अनुबोधपट ठरेल. त्यामुळे ‘दंगल’साठी मी ते स्वातंत्र्य घेतलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘दंगल’ची कथा लिहितानाच मी ती थोडीशी विनोदी स्टाईलने लिहिली आहे. कारण कुठे तरी असे चित्रपट करताना ते खूप गंभीर होऊ शकतात, याचा अनुभव आहे. शिवाय चित्रपटात एक सामाजिक संदेशही आहेच. त्यामुळे तो प्रवचनाच्या पातळीवर जाऊ नये आणि प्रेक्षकांचा रसभंग होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेऊन कथा लिहिली आहे. शेवटी गोष्ट तीच दाखवायची असते. त्यामुळे मूळ गोष्टीला धक्का न लावता प्रसंग बदल असतील, काही काल्पनिक व्यक्तिरेखांचा समावेश असेल, असं स्वातंत्र्य या चित्रपटासाठी घेतलं आहे.