पंकज भोसले
एच. पी. लव्हक्राफ्ट या गेल्या शतकातील भय-विचित्र कथा लिहिणाऱ्या लेखकाला संपूर्ण हयातभर उपेक्षेच्या गर्तेत राहावे लागले. पण त्याच्या मृत्यूनंतर दशकागणिक या लेखकाच्या साहित्याचे महत्त्व वाढत गेले. जगभरातील भयप्रेमींना रिझवण्यासोबत त्याच्या कथांनी भुतं, सैतानबाधित जागा, मनोभयाची अवस्था आकाराला आणण्यासाठी आराखडा तयार केला. सामान्य माणसांच्या वास्तववादी वातावरणाचा आणि ‘सर्रियल’ (अतिवास्तववादी) चळवळीचा साहित्य- कलाप्रांतातून उदोउदो होत असताना हा लेखक अद्भुतिका आणि भयप्रांतात स्व-कल्पित मिथकांची भर घालत होता. साठोत्तरीच्या कालखंडापासून जगभरातील भयकथाकारांनी ‘लवक्राफ्टियन हॉरर’चा आराखडा वापरत या साहित्यप्रकारात नवकल्पनांची भर घातली. हॉलीवूड चित्रपटकर्त्यांपासून मुख्य धारेतल्या साहित्यिकांना भयरसाचा वापर करताना लवक्राफ्टच्या गडद दृष्टिकोनाचा आधार घ्यावा लागला. त्यातून लोकप्रिय झालेली इंग्रजी नावे खूप आहेत, पण आपल्यासाठी आजही वाचकप्रियता टिकून असलेले नारायण धारप हे नाव महत्त्वाचे आहे. त्यांच्या भयांतिका आणि कादंबऱ्यांमधून बेमालूमपणे ‘लवक्राफ्टियन हॉरर’ मराठी वाचकांना परिचित झाला. त्यांची ‘सदूचे मित्र’ नावाची अवघ्या सात पानांची एक भयगोष्ट आहे. स्वत:शीच खेळण्यात दंग असलेल्या सदू नावाच्या आठ वर्षांच्या मुलाची. प्रकृती, स्वभाव आणि परिस्थिती या तिन्ही कारणांमुळे खेळायला मित्र नसल्याने त्याने कल्पनेतून वरूड-गणरू अशा काल्पनिक मित्रांना तयार केल्याची धारणा त्याच्या पालकांमध्ये असते. सदूच्या मनातील या काल्पनिक मित्रांबाबतचा भ्रम त्याचे वडील त्याला दटावून आणि मारून-मुटकून काढून टाकत असताना त्याचे मानसमित्र जो कहर घडवितात, त्यातून प्रचंड मोठा धक्का वाचकाला बसतो.
लवक्राफ्ट ते धारपांच्या सिध्यासाध्या सदूच्या गोष्टीचा संदर्भ सध्या भयसिनेवर्तुळात गाजत असलेल्या ‘डॅनियल इझण्ट रिअल’ या चित्रपटाला जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लवक्राफ्टच्या आराखडय़ाबरहुकूम रचलेल्या ब्रायन डेल्यू यांच्या ‘इन धिस वे आय वॉज सेव्ह्ड’ या कादंबरीवर या चित्रपटाचे कथानक बेतले असले, तरी धारपांनी तयार केलेल्या सदूच्या मानसमित्रांची गोष्ट येथे अधिक विस्ताराने पाहायला मिळू शकते.
चित्रपट सुरू होतो ब्रुकलीन शहरामधील एका कॅफेमधील संगीतमय सुखद वातावरण क्षणात बदलवून टाकणाऱ्या अंदाधुंद गोळीबाराने. माथेफिरूच्या हिंसाचारात काही माणसांचा बळी गेल्यानंतर पोलीस दाखल होण्याआधी तेथे शेजारच्या इमारतीतून ल्यूक नावाचा आठ वर्षांचा मुलगा अनवधानाने आलेला असतो. घरात आई-वडील भांडत असल्याने बऱ्यापैकी एकटा पडलेला ल्यूक बाहेर हिंडत असतो. तेव्हा या रक्ताचा सडा पडलेल्या कॅफेतून अनपेक्षितरीत्या एक समवयस्क मुलगा त्याला भेटायला येतो. डॅनियल हे आपले नाव सांगणारा मुलगा अल्पावधीत ल्यूकचा मित्र बनतो. त्यानंतर ल्यूक अनेकदा स्वत:शीच खेळताना दंग असलेला त्याच्या आईला पाहायला मिळतो. मात्र प्रत्यक्षात तो डॅनियल नावाच्या नव्या मित्रासोबत खेळण्यात रमलेला असतो. सुरुवातीला ल्यूकच्या एकांतावर मात करीत त्याचा आनंद वाढविणारा डॅनियल हळूहळू उपद्रवकारक ठरू लागतो. त्याच्या कारवाया आईच्या जिवावर बेतल्यानंतर ल्यूक आपल्या मानसमित्राला एका खोलीतील खेळघरात डांबून ठेवतो. शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेल्यानंतर डॅनियल आणि त्याचे खेळघर या दोहोंना तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो. एक तपानंतर जेव्हा तो आपल्या घरी परततो, तेव्हा कुतूहलाने आपल्या खेळघराचे दार उघडतो. त्याच्या आयुष्याला समांतर जगत त्याच्या इतकाच वयाची वाढ झालेला डॅनियल त्याच्या आयुष्यात परत येतो. फक्त त्यालाच दिसणारा तरुण डॅनियल (पॅट्रिक श्वात्झनेगर) परीक्षेत उत्तरे पुरविण्यापासून ते मुलीवर छबी पाडण्याच्या उद्योगात ल्यूकला (माईल्स रॉबिन्स) मदत करतो. पण लवकरच त्याची उपद्रवांची पोतडी उघडायला सुरुवात होते आणि ल्यूकचे आधीच ठीक नसलेले मनोस्वास्थ्य आणखी बिघडण्यास सुरुवात होते.
‘डॅनियल इझण्ट रिअल’ आताच्या काळातला सर्वाधिक दृश्यसमृद्ध भयपट म्हणावा लागेल. ‘लव्हक्राफ्टियन हॉरर’च्या नियमानुसार यातील वातावरण प्रचंड गडद आणि काळरात्रींनी भरलेले आहे. छिन्नमनस्कतेने ग्रासलेली आई, अल्पकाळासाठी मैत्रीण म्हणून लाभलेली चित्रकार केसी (साशा लेन) यांच्याव्यतिरिक्त ल्यूक डॅनियलच्या कृष्णकृत्यांमध्ये नाइलाजाने सहभागी होतो. नंतर त्याच्या कारवायांना टाळत डॅनियलच्या मुळांचा छडा लावायचा प्रयत्न करतो. ल्यूकचा मनोविकारतज्ज्ञ या प्रकरणात पाश्चिमात्य विचारशैली उपयोगी नसल्याचे ठरवत आफ्रिकी जादूटोण्याची सामग्री घेऊन दाखल होतो. पण परिणाम व्हायच्या ऐवजी तो डॉक्टरच जीव गमावून बसतो. ल्यूकचे शरीर हस्तगत करून वाटेल त्या कृत्यांमध्ये डॅनियल सहभागी झालेला पाहायला मिळाल्यानंतर ल्यूक या मानसमित्राने निर्माण केलेल्या भयप्रद परिस्थितीवर तोडगा काढायचे ठरवतो. पण त्याऐवजी स्वत:च डॅनियलने उभारलेल्या तुरुंगकवचात अडकून जातो.
लव्हक्राफ्टच्या अनेक मिथक, दैवतांमध्ये पाताळसदृश जगाची नोंद आहे. इथे गटारी भुयारात दडलेल्या ड्रग्जप्रेमी तरुणाईच्या भेटायच्या जागांपासून ल्यूकच्या घरातील वातावरणात पाताळयंत्री जग पाहायला मिळू शकते. अन् त्या विचित्र आणि असाधारण दृश्यांमध्ये एकसलगता राखल्यामुळे इथली भयमात्रा अधिक प्रमाणात अंगावर येऊ शकते. मानसिक आजारांचे आणि अभिजात पुस्तकांचे संदर्भ या कथानकाला आणखी धारदार बनवते. एकसुरी सायको-हॉरर आणि थ्रिलरच्या तिकिटबारीवर हमखास यश देणाऱ्या सिनेप्रकाराऐवजी जाणीवपूर्वक लव्हक्राफ्टियन हॉरर रचणारा हा चित्रपट भयपटप्रेमींसह इतरांसाठीही चुकवू नये असा आहे.