बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा चित्रपट ‘डार्लिंग’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. आलियानं या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणूनही पदार्पण केलंय. याशिवाय ती या चित्रपटात मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. नुकतीच आलियानं ‘इंडियन एक्सप्रेस अड्डा’ला मुलाखत दिली. यावेळी तिने इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका आणि चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांच्याशी संवाद साधला.
आलिया भट्टला या मुलाखतीत ‘बॉलिवूडवर राज्याकडून सांस्कृतिक दबाव आणला जातोय असं ऐकिवात आहे. जर हे खरं असेल तर त्यामुळे कलाकारांचं किती नुकसान होतंय?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आलिया म्हणाली, मला तरी वाटतं असा कोणाताच दबाव नाहीये. किमान माझ्यावर तर अद्याप कोणी असा दबाव आणलेला नाही. आपल्याला असं बरंच काही ऐकिवात असतं. माझ्या लग्नाबाबतही अशा बऱ्याच अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. पण त्यातली कोणतीच गोष्ट खरी नव्हती. पण जर हे असं होत असेल तर मला वाटतं की आम्ही आमच्या चित्रपटातूनच किंवा आमच्या कामातून त्याला उत्तर देणं योग्य ठरेल.
दरम्यान आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर ती तिचा ‘डार्लिंग’ चित्रपट येत्या ५ ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.