छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. ती मालिकेत पुन्हा कधी दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर मालिकेच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी ही लवकरच कमबॅक करणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी नुकतंच ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी “दयाबेनला परत आणण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला आहे. दया बेनची व्यक्तिरेखा परत न आणण्याचे आमच्याकडे कोणतेही कारण नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आपण सर्वजण कठीण प्रसंगाचा सामना करत आहोत. २०२०-२१ हे वर्ष आपल्या सर्वांसाठी फार कठीण होते. पण आता त्या गोष्टी चांगल्या झाल्या आहेत.”
साडी, चंद्रकोर अन् नाकात नथ; सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळ्या लूकमधील फोटो
“येत्या २०२२ मध्ये आम्ही दया बेनची व्यक्तिरेखा परत आणणार आहोत. यासाठी आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत. त्यामुळे प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच प्रेक्षकांना पुन्हा एकदा जेठालाल आणि दया भाभी यांची गंमत अनुभवायला मिळणार आहे”, असेही ते म्हणाले.
ही भूमिका नक्की कोण साकारणार असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावर असित कुमार मोदी म्हणाले, “दया बेनच्या भूमिकेसाठी दिशा वकानी तयार आहे की नाही, याची अद्याप मला माहिती नाही. पण दिशासोबत अजून आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. पण आता त्याचे लग्न झाले आहे. तिला एक मूल आहे. त्यामुळे ती तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे.”
समांथा आणि विजय देवरकोंडाचा शूटींगदरम्यान अपघात, गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल
“आपल्या प्रत्येकाला सर्वांचे स्वतःचे जीवन आहे. म्हणून मी त्याबद्दल काहीही बोलू शकणार नाही. पण दिशा बेन असो किंवा निशा बेन…तुम्हाला तुमची दयाबेन नक्कीच पुन्हा पाहायला मिळणार आहे. एक टीम म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा तिची मजा मस्ती देण्याचा प्रयत्न करु”, असेही असित कुमार मोदी यांनी सांगितले.
२०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला.