अलीकडेच गायक-संगीतकार-निर्माता-दिग्दर्शक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या शोमध्ये मुलाखत दिली आहे.
तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सत्तापालट, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान, दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांना फोन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नमस्कार अटलजी… माझा तुम्हाला प्रणाम. फोन लावण्याचं कारण असं की, जी स्वप्न तुम्ही पाहत होताच; ती स्वप्न मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. संसदेत पंतप्रधान असताना तुम्हाला हिणवत राममंदिर, कलम ३७०, समान नागरी कायद्याचे काय झाले? असं विचारलं गेलं. तेव्हा तुम्ही उत्तर दिलं की, आज मी २२ पक्षांचे सरकार चालवत आहे. त्यामुळे सर्वांचा मिळून अजेंडा आहे. ज्यादिवशी माझ्या पक्षाचे सरकार येईल आणि बहुमत असेल, तेव्हा या सर्व गोष्टी घडताना दिसतील.”
हेही वाचा : “उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात तेव्हा अजित पवारांना बरोबर घेऊन…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
“तुमच्या आशीर्वादाने मोदींच्या नेतृत्वात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं. आता राममंदिर सुद्धा होत आहे. कलम ३७० हटवण्यात आलं आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी नारा दिला होता, एक देश मैं ‘दो प्रधान, दो विधान और दोन निशाण नही चलेंगे, और मैं बिना परमिट काश्मीर जाऊंगा.’ तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर होता. जेव्हा परवानगीशिवाय श्यामा प्रसाद मुखर्जी हे काश्मीरमध्ये गेले. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर तुम्ही देशात आगीसारखी ही वार्ता पसरवली. आणि त्याचा परिणाम असा झाला की, शेवटी परमिट राज बंद झालं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“पण, कलम ३७० तुम्हाला खुपत होतं. आज मोदींनी कलम ३७० हटवलं. मला विश्वास आहे, लवकरच भारतात समान नागरी कायदा मोदींच्या नेतृत्वात येणार आहे. अणुस्फोट केल्यावर तुम्ही सांगितलं, मी कोणालाही दबणार नाही. तुम्ही ते करून दाखवलं. जगाने आपल्यावर निर्बंध लादले. पण, तरीही तुम्ही म्हणाला मी जगाकडे जाणार नाही. जग माझ्याकडे येईन. जगाने ते निर्बंध हटवले. आज मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तुम्ही संसदेत सांगितलं होतं, ‘सरकारे आयेगी, जायेगी, पार्टींया बनेगी बिघडेगी, ये देश रेहना चाहीये.’ याच मंत्रावर आज आम्ही काम करतोय. मला विश्वास आहे, मोदींना आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद प्राप्त होत असेल. तो असाच तुम्ही द्यावा, ही विनंती आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.