‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हे नाव नुसते घ्यायचा अवकाश शाहरूखने रंगवलेला राज आणि काजोलची सिमरन पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात. मग आपोआपच या दोघांवर चित्रित झालेली ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘मेरे ख्वाबों मे जो आए’सारखी गाजलेली गाणी, अमरिश पुरी यांनी रंगवलेले सिमरनचे कडक वडील, ‘बडी बडी देशों मे ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है..’ सारखे संवाद असा तो चित्रपट आपल्या डोळ्यांसमोरून पुन्हा पुन्हा सरकत राहतो. या चित्रपटाचा एक हजारावा आठवडा मराठा मंदिरमध्ये १२ डिसेंबरला साजरा होणार आहे. यानिमित्ताने, ‘दिलवाले.’चा एक खास प्रोमो चित्रित होतो आहे. मात्र, हा खास प्रोमो काजोलशिवाय रंगणार आहे.
आदित्य चोप्राने दिग्दर्शित केलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट १२ डिसेंबर १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १९ र्वष सातत्याने हा चित्रपट ‘मराठा मंदिर’मध्ये प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाला आजही मिळणारा प्रतिसाद इतका मोठा आहे की त्यावेळी निर्माता म्हणून यश चोप्रा यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चे एक हजार विक्रमी आठवडा होईपर्यंत सुरू ठेवावेत, असा करार ‘मराठा मंदिर’च्या व्यवस्थापनाबरोबर के ला होता. त्यानुसार, १२ डिसेंबर २०१४ ला या चित्रपटाचा विक्रमी प्रयोग ‘मराठा मंदिर’मध्ये रंगणार आहे. यानिमित्ताने, या चित्रपटाच्या खास आठवणी जागवणारा प्रोमो तयार करण्यात येणार आहे. मात्र, दुर्दैवाने काजोल या प्रोमोच्या चित्रीकरणात सहभागी होऊ शकणार नसल्याने तिच्याविनाच हा प्रोमो रंगणार आहे. खरे तर काजोल उत्साहाने या प्रोमोसाठी तयारी करत होती. पण घरच्या घरी धावपळ करत असताना तिचा पाय जोरात मुरगळला. सध्या तिच्या पायाला प्लॅस्टर लावण्यात आले असल्याने ‘दुल्हनिया’ला न घेता केवळ दिलवालेच या प्रोमोत गोंधळ घालणार आहेत.
१२ डिसेंबरला ‘मराठा मंदिर’मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा खास खेळ शाहरूख-काजोल आणि अन्य बॉलीवूडकरांच्या उपस्थितीत रंगणार असल्याचे कळते. काजोलच्या पायाला प्लॅस्टर लावण्यात आले असून तिला दोन आठवडय़ांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रोमोत काजोल दिसली नाही तरी ‘मराठा मंदिर’मध्ये १२ डिसेंबरला शाहरूखबरोबर ती आवर्जून उपस्थित राहणार आहे. एवढेच नाही तर या हजाराव्या विक्रमी प्रयोगाच्या प्रसिद्धीसाठी ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमध्येही एक खास भाग चित्रित करण्यात येणार असून त्याचे चित्रीकरण ३० नोव्हेंबरला होणार आहे. त्यावेळी काजोल आणि शाहरूख दोघेही या भागात सहभागी होणार असून चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तरीही ‘दिलवाले..’चा प्रोमो मात्र दुल्हनियाशिवायच पाहावा लागणार!

Story img Loader