हिंदी चित्रपटसृष्टीतील दंतकथा बनून राहिलेल्या “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‘ हा चित्रपट या आठवड्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. राज आणि सिमरन यांच्या अदाकारीने गाजलेल्या या चित्रपटाच्या एक हजाराव्या विक्रमी आठवड्याला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया’ ने सलग १९ वर्षे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करत यापूर्वीचा ‘मुगल-ए-आझम’चा आठ वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
शाहरूख खान आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‘ १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच त्याच्या नावावर नवनवीन विक्रमांची नोंद होत आली आहे. संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला होता. आदित्य चोप्राचे पहिलेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने “न्यू एक्‍सलसीयर‘ चित्रपटगृहात ५० आठवडे साजरे केल्यानंतर तो मराठा मंदिरमध्ये झळकवण्यात आला. तेव्हापासून आजतागायत येथे या चित्रपटाचा “मॅटिनी शो‘ सुरू आहे.

Story img Loader