बॉलिवूड आणि चाहत्यांना ज्या विवाहाची प्रतीक्षा लागून आहे असा दीपिका आणि रणवीर सिंगचा विवाहसोहळा आज संपन्न होणार आहे. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरूवात झाली असून लग्नाच्या आदल्या दिवशी कोंकणी पद्धीतनं दोघांचा साखरपुडा पार पडला.
दीपिका आणि रणवीर हे दोघंही कोंकणी आणि सिंधी पद्धतनीनं विवाह करणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी फुल मुड्डीचा विधी पार पडला. पारंपरिक कोंकणी पद्धतीनुसार वधुचे पिता वराचं आणि त्याच्या कुटुंबीयांच श्रीफळ देऊन स्वागत करतात. त्यानंतर वधु वर एकमेकांना अंगठी घालतात. साखरपुडा पार पडल्यानंतर लेक कोमो परिसरातच संगीत सोहळाही पार पडला. गायिका हर्षदीप कौरने या संगीत सोहळ्याला चार चाँद लावले होते. यावेळी दिलबरो, मनमर्जियां यांसारखी बॉलिवूड सुपरहिट गाणी तिनं गायली.
दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले मोजकेच लोक इटलीतल्या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकानं ठेवली असल्याचं समजत आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी शाहरुख, फराह खान संजय लीला भंन्साळीसह केवळ चाळीसच लोक उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.