नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. अशा परिस्थितीत आता चित्रपटाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. मात्र, अजूनही अनेकजण या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करताना दिसत आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडलेल्या या चित्रपटाने बॉयकॉट गँगला मात देत स्वतःला सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाचे प्रदर्शन पाहून त्याचे निर्माते आणि स्टारकास्ट खूप खूश आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
निर्माता करण जोहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहरुख खान, आमिर खान आणि करण जोहर दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना करणने लिहिलं, “सर्वात मोठा ब्लॉकबस्टर.” या फोटोचा संबंध ‘ब्रह्मास्त्र २’च्या स्टारकास्टशी जोडला जात आहे.
आणखी वाचा-Video: चालण्यावरून मनिष पॉलने भर कार्यक्रमात उडवली मलायकाची खिल्ली, व्हिडीओ व्हायरल
करण जोहरने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या फोटोमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे कलाकार एकत्र दिसत आहेत. मात्र, काही कलाकार असे आहेत जे सध्या चित्रपटात दिसलेले नाहीत. अशा परिस्थितीत आता या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणही या चित्रपटाचा एक भाग असेल असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत. यासोबतच रणवीर सिंग आणि आमिर खान ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र करणने शेअर केलेला हा फोटो २०१८ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीदरम्यान क्लिक करण्यात आला होता.
दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पहिल्या भागात शिवाच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि त्याच्या पालकांबद्दल एक कुतूहल निर्माण झाले आहे. पण पहिल्या भागात या पात्रांबद्दल काहीच दाखवण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रणबीरच्या शिवाच्या आई-वडिलांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण रणबीरच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे आगामी काळातच समजणार आहे.