बॉलीवूडमध्ये प्रसिद्धीच्या प्रवाहात नेहमी नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये शीतयुद्ध राहिले आहे हे सर्वश्रृत आहे. मात्र, सध्याची पीढी आपल्या क्षेत्रातील स्पर्धेचे वैर बाळगण्यावर विश्वास ठेवत नाही. गैरसमज झालेच तर त्वरित दूर करण्यासाठी पुढाकार घेताना सध्याची बॉलीवूड पीढी दिसते. असाच पुढाकार यावेळी बॉलीवूडची ‘लीला’ दीपिका पदुकोणने घेतला.
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कंगना रणावत यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चेचे पेव सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये फुटले होते. मात्र, दीपिकाने यावेळी कंगनाला थेट फोन करून सर्व गैरसमज दूर केले आणि शीतयुद्धाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
कंगनाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याची सविस्तर माहिती दिली. ती म्हणाली की, “दीपिकाने मला फोन करून मनात कोणतेही वैयक्तिक समीकरण बाळगत नसल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच आपण कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याने दीपिकाने मला समर्पित करून स्विकारलेल्या पुरस्कारावर जाहिररित्या कमेंट करणे किंवा स्विकारणे योग्य वाटत असल्याचीही मी दीपिकाला समजावून सांगितले. आमच्यात अतिशय चांगले संभाषण झाले. फोन करून गैरसमज दूर करण्याच्या दीपिकाच्या पुढाकाराची मी प्रशंसा करते.” दीपिका सौजन्यशील आणि अतिशय भावनिक आहे. तिचे हेच गुण आपल्याला आवडतात असल्याचेही कंगना पुढे म्हणाली.
दरम्यान, या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चेची सुरूवात एका पुरस्कार सोहळ्यातून झाली होती. क्विन चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना रणावत अनेक पुरस्कारांची मानकरी ठरत असतानाच्या काळात एका पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार कंगनाच्यावतीने स्विकारत असल्याचे दीपिकाने म्हटले होते. त्यावर कंगनाने कोणतीही प्रतिक्रिया किंवा दीपिकाचे आभार मानले नव्हते. यानंतर ‘क्विन’ चित्रपटातील भूमिकेचे आपल्या मित्र परिवारातील प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, सलमान, आमीर आणि अमिताभ बच्चन या दिग्गजांनी फोन करुन कौतुक केले होते, असे कंगनाने सांगितले होते. यामध्येही दीपिकाचा उल्लेख नव्हता.

Story img Loader