संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंग तन-मन हरपून काम करतो आहे. बाजीरावाच्या भूमिकेसाठी केवळ शारीरिक बदलांवर थांबून रणवीरला चालणार नाही. मुळात पेशवाई आणि मराठय़ांचा इतिहास समजून घ्यायचा, त्यानंतर बाजीरावाच्या व्यक्तिमत्त्वापासून त्याच्या विचारापर्यंत सगळ्या गोष्टी तंतोतंत अभिनयातून उतरवायच्या हे रणवीरसाठी फार मोठे आव्हान आहे आणि हे लक्षात घेऊन रणवीरनेही त्यासाठी क ठोर मेहनत सुरू के ली आहे. मात्र, बाजीरावाच्या भूमिकेत हरवात चाललेल्या रणवीरला पाहून दीपिकाला अंमळ भीती वाटू लागली आहे. एरवी रणवीर सिंग नेहमी मजा-मस्ती करणारा, हवे तसे बोलणारा-वागणारा असा मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा माणूस म्हणून सर्वानी पाहिला आहे. मात्र, बाजीरावच्या भूमिकेसाठी त्याने पहिले म्हणजे डोक्यावरचे केस भादरून घेतले आहेत. हा निर्णय त्याच्यासाठी सर्वात अवघड होता. मात्र, बाजीरावाच्या भूमिकेत शिरायचे तर पहिले त्याच्यासारखे दिसणे ही महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे त्याने पहिल्यांदा केस भादरून घेतले आहेत. शारीरिक बदल तर महत्त्वाचे आहेत ते मी करतो आहे. पण, या भूमिकेसाठी काही दिवस मी गायब असणार आहे. सगळ्यांपासून दूर जाऊन केवळ या भूमिके चा अभ्यास करणे माझ्यासाठी गरजेचे झाले आहे. मला बराच काळ या भूमिकेसाठी द्यावा लागणार असल्याने मी तेवढे दिवस नातेवाईक, परिचित, सोशल मीडियापासून दूर असणार आहे, असे रणवीरने सांगितले आहे. माझ्या सगळ्या जाहिराती आणि ज्या ज्या ब्रँडचे प्रतिनिधित्व मी करतो आहे त्यांचे कार्यक्रम याआधीच पूर्ण करून घेतले आहेत. आणि आता बाजीराववर लक्ष केंद्रित केले आहे, असे त्याने सांगितले.
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून फिल्मसिटीच्या अगदी जवळ गोरेगावमध्ये रणवीरने काही दिवसांसाठी एक अपार्टमेंट भाडय़ाने घेतले आहे. मुंबईची वाहतूक कोंडी पाहता गाडीने प्रवासात वेळ घालवण्यापेक्षा गोरेगावातच राहून चित्रिकरणासाठी योग्य वेळ देता येईल, म्हणून त्याने गोरेगावात भाडय़ाने घर घेतले आहे. मात्र, त्याच्या या सगळ्या प्रकारांमुळे दीपिका चांगलीच धास्तावली आहे. बाजीराव-मस्तानी चित्रपटात रणवीरबरोबर तीही मुख्य भूमिकेत आहे. पण, ज्याप्रकारे रणवीर सगळ्या जगाशी संपर्क  तोडून केवळ बाजीरावाचा विचार करतो आहे त्यामुळे पुढे त्याला या भूमिकेतून बाहेर पडणे कठीण होईल, असे तिला वाटते आहे. बाजीरावाची भूमिका एवढी मनावर घेऊ नकोस, असा सल्लाही तिने रणवीरला दिल्याचे समजते. मात्र, दिग्दर्शक म्हणून भन्साळींच्या कामाची पध्दत ही अशीच अवघड आहे. कलाकारांनी भूमिकेत शिरलेच पाहिजे, हा त्यांचा हट्ट असतो आणि ते त्यांच्या कलाकारांकडून त्या पध्दतीनेच काम करून घेतात, याचा अनुभव खुद्द दीपिकाला असल्याने रणवीरला त्यातून बाहरे काढणे तिच्यासाठी भलतेच अवघड होऊन बसले आहे.

Story img Loader