दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधलं सर्वात लोकप्रिय जोडपं. या दोघांचेही जगभरात चाहते आहेत. या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यांत दीपिकाच्या येण्यानं रणवीरच्या आयुष्यात काय बदल झाले हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. त्या निमित्तानं एका मुलाखतीत रणवीरला लग्नानंतर दीपिकानं तुझ्या कोणत्या सवयींवर बंदी घातली? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दीपिकानं लग्नानंतर मला तीन गोष्टी करण्यास कायमची बंदी घातली असं रणवीरनं मिश्किलपणे सांगितलं.

रात्री उशीरापर्यंत घराबाहेर थांबण्यास दीपिकानं मला सक्त मनाई केली असल्याचं रणवीरनं मुलाखतीत म्हटलं. इतकंच नाही तर उपाशीपोटी घरातून बाहेर पडायचं नाही अशी तंबी तिनं मला दिली आहे त्यामुळे कितीही महत्त्वाचं काम असलं तरी उपाशीपोटी घर सोडण्यास तिनं बंदी घातली आहे असं रणवीर म्हणाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फोन कॉल चुकवायचा नाही असंही दीपिकानं मला बजावलं असल्याचंही रणवीरनं कबुल केलं. कामामुळे तिचा फोन उचलला नाही तर वेळ मिळताच लगेच फोन करायचा असं दीपिकानं मला बजावून ठेवलं आहे त्यामुळे तिनं सांगितलेल्या गोष्टी मी कटाक्षानं पाळतो असंही त्यानं सांगितलं.

रणवीर आणि दीपिका गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. १४ आणि १५ नोव्हेंबरला पारंपरिक सिंधी आणि कोंकणी पद्धतीनं ते दोघंही विवाहबंधनात अडकले.

Story img Loader