होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेकांनी तर होळीच्या तयारीला सुरुवातही केली असेल. बॉलिवूड तारे-तारकासुद्धा मोठ्याप्रमाणावर होळी खेळतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण यंदाच्या होळी सेलिब्रेशनबाबतच्या तिच्या योजना आणि आठवणी सांगतेय…
होळीबद्दलची तुझी लहानपणीची छानशी आठवण सांग ना…
होळी हा माझा लहानपणापासून आवडता सण. शाळेतून आल्यावर बिल्डिंगमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर होळी खेळणं ही माझ्या बालपणीची होळीबद्दलची सर्वात प्रिय आठवण. या सणाची तयारी एक आठवडा आधीपासूनच चालू होई.
तुझं आवडतं होळीचं गाणं कोणतं?
‘यह जवानी है दिवानी’ मधलं ‘बलम पिचकारी’ हे माझं सध्याचं सर्वात आवडतं होळीचं गाणं आहे.
होळी दरम्यान तू सौंदर्य आणि आरोग्याची काळजी कशी घेतेस?
होळीदरम्यान मला सर्वाधिक कशाची काळजी वाटते तर ती माझ्या केसांची. केसांना खोबरेल तेल लावल्याने त्यांच्यावर एक सुरक्षा कवच निर्माण होतं ज्यामुळे रंग आणि ऊन अशा दोघांपासून केसांचं रक्षण होतं. मी एका बाजूला केसांची वेणी बांधते किंवा विस्कटलेल्या केसांचा सरळ एक पोनीटेल बांधून टाकते. शिवाय शरीरात आर्द्रता टिकून राहिल, याचीही मी काळजी घेते.
यंदाची होळी तू कशी साजरी करणार आहेस?
यंदाच्या होळीला मी माझ्या ‘हॅप्पी न्यू इयर’ या सिनेमाचं शूटिंग करत असेन. आमचा एक छान ग्रुप तयार झाला आहे आणि मला खात्री आहे की होळीच्या दिवशी आम्ही सेटवर खूप धमाल करू.