रणबीरबरोबर प्रेमाचे नाते तुटल्यानंतरही ‘यह जवानी है दिवानी’मधून रणबीर आणि दीपिका पुन्हा एकत्र आले. त्याच्या प्रमोशन्सच्या निमित्ताने आणि चित्रपटाला यश मिळाल्यानंतरही जेव्हा जेव्हा म्हणून दोघेही एकत्र आले तेव्हा आपल्या दोघांमध्ये मैत्रीचा एक धागा अजूनही कसा घट्ट आहे आणि रणबीरला समजून घेण्यात आपण कोणतीही कसर राहू दिलेली नाही हे सांगण्याची एकही संधी दीपिकाने सोडली नाही. लगोलग, ‘यह जवानी है दिवानी’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ हिट झाल्यानंतर तर दीपिकाने कतरिनाची नंबर वनची मक्तेदारी मोडीत काढली आणि त्यानंतर मात्र ती कतरिनाच्या मागे हात धुवून लागली आहे. कतरिनावर जाहीर टीका, तिचे चित्रपट एवढेच नाही तर आता कतरिनाकडे असलेल्या जाहिरातीही आपल्याकडे खेचण्यात दीपिका यशस्वी झाली आहे.
कतरिना आणि रणबीरची स्पेन छायाचित्रे प्रसिध्द झाल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना कतरिनाने काळजी घ्यायला हवी होती, असा जाहीर सल्ला दीपिकाने दिला होता. दीपिकाची ही विधाने ऐकल्यानंतर चिडलेल्या कतरिनाने दीपिकासारख्या अभिनेत्रीने जिच्या प्रेमसंबंधांची जास्तीत जास्त छायाचित्रे आजवर प्रसिध्द झाली आहेत तिने दुसऱ्यांना सल्ले देऊ नयेत, असे खरमरीत उत्तरही दिले होते. मात्र, तरीही कतरिनाच्या मागे लागलेली दीपिका नावाची डोकेदुखी अजून संपलेली नाही. कतरिना ज्या साबणाच्या जाहिरातीसाठी प्रसिध्द आहे त्यांनी आता दीपिकाला मॉडेल म्हणून ऑफर दिली आहे. कतरिनाने या जाहिरातीसाठी ४ कोटी रुपये मानधन घेतले होते तर दीपिकाने याच जाहिरातीसाठी सहा कोटी रुपये मागितले आहेत. दीपिकाकडे यावर्षी ‘रामलीला’, ‘हॅप्पी न्यू इअर’, ‘फाईंडिंग फॅनी फर्नाडिस’ आणि इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ज्यात पुन्हा एकदा दीपिका आणि रणबीर एकत्र येणार आहेत, असे चार मोठे चित्रपट रांगेत असल्यामुळे तिला मागणी मोठी आहे, हे वास्तव कतरिनाला नाकारून चालणारे नाही.
शिवाय, दीपिका-रणबीर ही जोडी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय झाली असल्यामुळे कतरिनासाठी सगळेच अवघड होऊन बसले आहे. दीपिका मात्र सध्या आपल्या सध्याच्या लोकप्रियतेचा जास्तीत जास्त फायदा घेते आहे. तर ज्या रणबीरवरून या दोन बायकांमध्ये धुसफू स सुरू आहे तो मात्र शांतपणे ‘बेशरम’च्या प्रसिध्दीत गुंतला आहे.

Story img Loader