सर्व काही नीट जुळून आल्यास बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि आजची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉलिवूड सुंदरी दीपिका पदुकोणचे स्टार सध्या जोमात असून, तिच्या सलग पाच चित्रपटांनी १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. ‘गोलियों की रासलिला-रामलिला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘ये जवानी हैं दिवानी’, ‘रेस-२’ आणि हल्लीच प्रदर्शित झालेला शाहरूख खानबरोबरचा ‘हॅप्पी न्यू इअर’ या तिच्या चित्रपटांनी १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभाग नोंदविला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानबरोबर आत्तापर्यंत तीन चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसलेल्या दीपिकाने आपल्या चित्रपट कारकिर्दित सलमान खानबरोबर अद्याप काम केलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, लवकरच ती सलमान खानबरोबर काम करणार असल्याचे समजते. अली अब्बास जफर दिग्दर्शित यश राज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात हे दोघे एकत्र काम करताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलमान खानने याआधी यश राज फिल्म्सच्या ‘एक था टायगर’ चित्रपटात कतरिना कैफबरोबर काम केले आहे. शाहरूख खान प्रमाणेच सलमान खानदेखील दीपिकासाठी लकी स्टार ठरू शकतो का हे पाहेणे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader