बॉलीवूडमधील काही कलाकार आपल्या साचेबद्ध भूमिकेतून बाहेर पडून वेगळ्या भूमिकेच्या नेहमी शोधात असतात. बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने असेच एक आव्हान स्वीकारले असून यात ती २० किलोचे चिलखत परिधान करणार आहे.
‘गोलियों की रास लीला-राम लीला’ आणि रजनीकांत यांच्या ‘कोच्चीदियान’ या चित्रपटानंतर दीपिकाचे चाहते तिच्या नव्या चित्रपटाची वाट पाहात आहेत. लवकरच तिचा ‘पिकू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वडील आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटापेक्षाही बॉलीवूड आणि दीपिकाच्या चाहत्यांना जास्त उत्सुकता आहे ती ‘बाजीराव मस्तानी’ या तिच्या आगामी चित्रपटाची. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणजे पहिले बाजीराव पेशवे. बाजीराव म्हटले की, मस्तानीचे नाव ओघाने येणारच. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे शिवधनुष्य उचलले आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण ‘मस्तानी’ची भूमिका साकारत आहे. मस्तानी ही बाजीरावाप्रमाणेच एक उत्कृष्ट लढवय्यी म्हणून प्रसिद्ध होती. त्यामुळे साहजिकच चित्रपटात तो संदर्भ आहेच आणि दीपिका ही भूमिका साकारत असल्याने तिला चित्रपटात चिलखत घालावे लागणार आहे. चित्रपटातील ‘मस्तानी’च्या भूमिकेसाठी दीपिकाला २० किलोचे चिलखत परिधान करावे लागणार आहे. तसेच चित्रपटात ती तलवारबाजीही करताना पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्याच ‘गोलियों की रास लीला-राम लीला’ चित्रपटात दीपिकाने सुमारे ३० किलो वजनाचा लेहेंगा (घागरा) परिधान केला होता. आता ‘मस्तानी’साठीही दीपिका तब्बल २० किलो वजनाचे चिलखत परिधान करणार आहे. दीपिकाच्या या पेहेरावाची तिच्या चाहत्यांबरोबरच समस्त बॉलीवूडलाही उत्सुकता आहे.

Story img Loader