बॉलिवूडमध्ये एकमेकांचे पाय खेचणे, सहकलाकारांची टिंगलटवाळी करणे या गोष्टी नवीन नाहीत. सध्या तर करण जोहरने आपल्या ‘कॉफी विथ करण’ या शोमधून बॉलिवूड कलाकारांना एकमेकांच्या नाकदुऱ्या काढण्याचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा उठवत सोनम कपूरने दीपिका पडुकोणवर तोंडसुख घेतले. दीपिकाने मात्र, इतरांच्या बडबडीने आपल्या यशावर काहीही परिणाम होणार नसल्याचे शांतपणे सांगत सोनमचा वार ‘हवेतच वाया’ जाईल अशी काळजी घेतली.
बॉलिवूडची सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून दीपिका आज नंबर वन असली तरी तिने चित्रपटांबरोबरच सध्या आपल्या चाहत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मदतीने काही निवडक चाहत्यांना या ना त्या निमित्ताने भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे या गोष्टींवर दीपिका भर देते आहे. आपल्या चाहत्यांबरोबर नुकताच तिने रॅम्पवॉक करत खास कलेक्शनही सादर केले आहे. दीपिकाच्या या गोष्टींना सोनमने ‘थिल्लरपणा’ असे संबोधले आहे. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दीपिकाला स्वत:ला फॅशनबद्दल काही कळत नाही. केवळ तिच्या टीमच्या इशाऱ्यावर नाचण्यात ती सध्या धन्यता मानते आहे, अशे शेलके शेरे सोनमने मारले. मात्र, दीपिकाने सोनमच्या या शेऱ्यांना केराची टोपी दाखवली आहे.
इतर कोणी कितीही बडबड केली तरी मी जिथे आहे तिथेच राहणार. त्याने माझ्या यशात काही फरक पडणार नाही, असे स्पष्ट क रत मी इथे नंबर वन राहण्यावर लक्ष केंद्रित केलेले नाही. मला हरतऱ्हेच्या दिग्दर्शकांबरोबर, अभिनेत्यांबरोबर काम करण्यात रस आहे आणि त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त चित्रपट कसे करता येतील, यात मला रस आहे, असे दीपिकाने म्हटले आहे. शाहरूखबरोबर ‘हॅप्पी न्यू इअर’, अर्जुन कपूरबरोबर पहिल्यांदाच ‘फाईंडिंग फॅनी फर्नाडिस’ आणि भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ असे तीन चित्रपट तिच्या हातात आहेत. पण, भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’वर बोलण्यापेक्षा आपल्याला इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायला आवडेल, असेही ती सांगते. इम्तियाजच्या चित्रपटात ती पुन्हा रणबीर कपूरबरोबर काम करणार असून त्याच्यासारख्या जुन्या आणि सर्वात जवळच्या मित्राबरोबर काम करायला नेहमीच आवडेल, असेही ती मोकळेपणानेसांगते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा