बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात दीपिका -रणवीरने डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर बंगळुरूमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होते. दीप-वीरच्या या पार्टीमध्ये अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात कला आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावत या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. दीप-वीरच्या लग्न आणि रिसेप्शनमधील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरत असून आता या पार्टीमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बंगळुरुमध्ये आयोजित या ग्रँण्ड रिसेप्शनच्या ठिकाणी दीपिकाने रणवीरच्या हातात हात घालून प्रवेश केली. दीप-वीरची एण्ट्री होताच साऱ्याचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं आणि या नवदाम्पत्याचे फोटो काढण्यासाठी अनेकांचे कॅमेरा पुढे सरसावले. इतकंच नाही तर दीप-वीरही प्रसारमाध्यमांना चांगल्या चांगल्या पोझ देत होते. यावेळी पोझ देत असताना दीपिकाच्या साडीचा पदर उलटा झाला. विशेष म्हणजे रणवीरने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने दीपिकाच्या साडीचा पदर नीट केला. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

साडीचा पदर नीट केल्यानंतर रणवीरने दीपिकाला फ्लाईंग किसही दिली. एका आदर्श नवऱ्याप्रमाणे रणवीरने केलेलं काम पाहून दीपिकाही आश्चर्यचकीत झाली आणि पटकन लाजली. दीप-वीरने १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत लेक कोमा येथे एका व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे.