MeToo चळवळीमध्ये रोज एकाहून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यानंतर बॉलीवूडमधील अनेकांची नावे या मोहीमेत समोर आली आहेत. संस्कारी बाबू म्हणून ओळख असलेल्या अलोक नाथ यांच्यावरही विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे बलात्कारासारखे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बॉलीवूडमधील लोकांना तसेच सामान्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या आरोपांनंतर आलोक नाथ यांनी विनता नंदा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. याबरोबरच आलोक यांची पत्नी आशु सिंह यांनी विनता यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून अवघा एक रुपया मागितला आहे.
आलोकनाथ यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचं म्हणत विनता नंदा यांनी त्यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून काही गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर विनता आणि आलोकनाथ यांच्यामध्ये असणांरं हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र कायद्यापर्यंतही पोहोचलं. त्यांच्याकडे आता लोक एक आरोपी म्हणून पाहतात अशी प्रतिक्रीया त्यांची पत्नी आणि वकिल यांनी दिली होती. आशु ही आपली चांगली मैत्रीण आहे आणि आपण तिच्याही कानावर आलोक नाथ यांच्या वागण्याची गोष्ट घातली होती. मात्र आपण यावर काहीच करु शकत नाही असे सांगत तिने याकडे दुर्लक्ष केल्याचे नंदा यांनी सांगितले होते. नंदा यांच्यानंतर ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची क्रू मेंबर, अभिनेत्री संध्या मृदुल, नवनीत निशान यांनीसुद्धा आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
वनिता यांनी केलेल्या बलाक्ताराच्या आरोपाला उत्तर देताना अलोक नाथ म्हणाले, मी या विषयावर अधिक बोलणार नाही कारण तितकाच तो ताणला जाईल. एकेकाळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. आज तिने माझ्यावर इतके गंभीर आरोप केले आहेत. आज ती जे काही आहे, ते माझ्यामुळेच आहे. तिने केलेल्या आरोपांवर मी काही प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे, कारण सध्याच्या घडीला महिला जे बोलते तेच सत्य मानलं जातं.