|| सुहास जोशी

गुन्हे शोधकथा हा कायमच सर्वाधिक वाचला पाहिला जाणारा प्रकार आहे. गुन्हा कोणताही असो, मग तो अमली पदार्थाच्या अवैध व्यापाराचा असो की चोरी, लूटमारी किंवा खून, बलात्कार. दूरचित्रवाणीवर गुन्हेशोधसंबंधातील अनेक मालिका आजवर गाजल्या आहेत. काही जे घडले ते जसेच्या तसे नाटय़रूपांतर करणाऱ्या, तर काही त्यात आणखीन नाटय़ निर्माण करणाऱ्या. अशा वेळी ज्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले अशा गुन्ह्याची तपासकथा वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या चांगलीच गाजत आहे. प्रत्यक्ष ती घटना, त्या अनुषंगाने झालेल्या पुढील घडामोडी, त्यातील राजकारण, यंत्रणांची कमजोरी आणि त्याच वेळी यंत्रणांनी त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी केलेली धडपड असे अनेक कंगोरे या संपूर्ण घटनेला आहेत. यातील इतर घटनांवर किमान लक्ष केंद्रित करत, एक गुन्हे तपासकथा म्हणून सादर केलेली ‘दिल्ली क्राईम’ ही वेबसीरिज नक्कीच वेधक अशी आहे.

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीमध्ये शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये झालेला बलात्कार, त्याचबरोबर पीडित महिलेस मरणाच्या दारात पोहचवणारे शारीरिक अत्याचार करणाऱ्या सहा नराधमांना कसे पकडले गेले ही घटना या वेबसीरिजच्या मध्यवर्ती आहे. कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसणाऱ्या या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी केलेली धडपड यामध्ये दिसते. काहींना दिल्ली, गुरगावमधील विविध भागांतून पकडले जाते, तर काही जणांना दिल्लीबाहेर जाऊन. पोलीस त्यांचा माग कसा काढतात, यंत्रणांचा वापर कसा करतात, आपले सोस्रेस कसे वापरतात याची ही कहाणी. हे सर्व सुरू असताना एकूणच इतर यंत्रणा या घटनेकडे कसे पाहतात, समाजाची मानसिकता काय असते अशा अनेक गोष्टींचे दर्शन यानिमित्ताने होत राहते. हे सर्व गुन्हेगार नेमके कसे पकडले गेले ते प्रत्यक्ष पाहणेच अधिक योग्य ठरेल.

या सर्व घटनाक्रमाला त्या काळातील प्रसिद्धीमाध्यमांतील वृत्तांशी ताडून पाहावे की नाही हा पूर्णपणे वेगळा मुद्दा होऊ शकतो. किंबहुना त्यांची सत्यासत्यता पडताळली तर मालिकेत काही उणिवादेखील जाणवू शकतात. इतकेच नाही तर कदाचित पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेल प्रयत्न या सदरातदेखील मोडणाऱ्या बाबी यात आहेत. पण या सर्व बाबी बाजूला ठेवून एक गुन्हेतपास कथा म्हणून याकडे पाहताना या मालिकेचे महत्त्व वेगळे आहे. कारण आजवरच्या पारंपरिक गुन्हेतपासकथांपेक्षा हिचा बाज वेगळा आहे. डॉक्युड्रामा म्हणजेच सत्य घटनेचे नाटय़रूपांतर असा एक प्रकार दृक्श्राव्य सादरीकरणात वापरला जातो. पण ही मालिका केवळ डॉक्युड्रामा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हल्ली अशा घटनांवर वृत्तवाहिन्या ज्या प्रकारचे हिडिस वाटावे असे नाटय़रूपांतरण किंवा भडक रेखाचित्रांच्या साहाय्याने सादरीकरण करतात तो प्रकार पूर्णत: टाळला आहे.

‘एक शून्य शून्य’, ‘सीआयडी’, ‘क्राईम पट्रोल’सारख्या मालिकांमध्ये अनेक गुन्हेतपासकथा प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत आणि त्यांना चांगलीच लोकप्रियतादेखील लाभली आहे. त्या पाश्र्वभूमीवर वेब माध्यमातील ही मालिका तुलनेने बरीच वेगळी आणि उजवी आहे. त्या घटनेचे अनेक कंगोरे पकडत तपासकथेवर पकड ढिली पडू न देता ही मालिका सादर होते. तिचा सर्वाधिक लक्ष हे तपासावरच आहे. अगदी गरजेनुसार इतर बाबींना हात घातला आहे. पण त्या सर्वातून एक थेट भाष्य नक्कीच होत राहते. त्यामुळे केवळ थरारक वगैरे सादर करण्याच्या मोहात ही मालिका पडत नाही.

मालिकेचे कथानक प्रचंड वेगवान असले तरी प्रत्येक वेळी पुढे काय होणार ही प्रेक्षकांना असलेली मूलभूत उत्सुकता टिकवून ठेवण्यात मालिका यशस्वी होते. बहुतांश वेळा असे कथानक पाहताना प्रेक्षक स्वत:ची बुद्धी वापरून काही ना काही तर्क लावत असतो. पण अशा तर्काना येथे वावच मिळत नाही. अनेक क्लू येथे मिळतात पण त्यांचा माग काढून गुन्हेगारास कसे पकडले हे तुम्ही पुढील कथानक पाहत नाही तोपर्यंत उमगत नाही. आणि तो तपास पाहण्याची उत्सुकता टिकून राहते हे या सादरीकरणाचे वैशिष्टय़.

सहा दिवसांच्या शोधमोहिमेबरोबरच इतर यंत्रणांची कुरघोडी यात दिसून येते. दिल्लीची कायदा-सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या हाती नसून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हाती असणे, त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप, आणि माणसे हटवण्याचे प्रयत्न असे बरेच काही यातून समोर येते. या मालिकेच्या निमित्ताने यंत्रणेतील काही उणिवांवर अतिशय प्रभावी पण संयतपणे स्पष्ट भाष्य केले जाते हा या मालिकेचा आणखीन एक महत्त्वाचा पलू आहे. पोलीस ठाण्यातील वीजपुरवठा वगरेसारख्या मूलभूत सुविधांची वानवा, न्यायवैद्यक (फोरेन्सिक) पथकांकडून होणारी दिरंगाई, पोलिंसानी गुन्ह्याची उकल करताना वेगवान वाहतूक सुविधा वापरण्यात येणाऱ्या अडचणी, साक्षीदारांची सुरक्षा सांभाळण्यासाठीचा खर्चाचा प्रश्न अशा अनेक बाबी आणि त्यावर पोलिसांनी त्याच्या पद्धतीने केलेली मात अत्यंत खुबीने यामध्ये मांडली आहे. यंत्रणांना मूलभूत त्रुटींना सामोरे जावे लागणे हे आपल्याकडे हे किती नियमित बाब आहे याची जाणीव सीरिजकर्ते अतिशय सहजपणे करून देतात. विशेष म्हणजे संपूर्ण मालिकेत प्रसिद्धीच्या झोतातील कलाकारांचा किमान वापर झाला आहे. आणि प्रत्येक कलाकाराने त्यांची भूमिका अतिशय ताकदीने मांडली आहे.

महिलेवरील बलात्कार, तिच्यावरील निर्घृण असे शारीरिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न हे अगदी थेटपणे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. पण अशा वेळी तीच यंत्रणा जर सारी शक्ती, युक्ती लावून काम करू लागते तेव्हा इतर सर्वच यंत्रणा कशा जलदगतीने काम करतात हे यातून अगदी ठळकपणे दिसून येते. त्यामुळेच सत्यतेच्या कसोटीवर ही गुन्हेशोधकथेत काही बदल असले तरी ती वेधक ठरते हे नक्कीच. मात्र ती कितीही वेधक असली तरी मूळ प्रश्न मात्र तसाच राहतो ही सल हे सर्व पाहताना टोचतदेखील राहते.

 

  • दिल्ली क्राईम
  • ऑनलाइन अप – नेटफ्लिक्स
  • सीझन – पहिला

Story img Loader