नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘दिल्ली क्राईम’ या वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे, या सीरिजचा पहिला सीझन निर्भया प्रकरणावर बेतलेला होता. तर दुसऱ्या सीझनमध्ये दिल्लीमध्ये हैदोस घालणाऱ्या ‘चड्डी बनियन गँग’च्या कथानकावर बेतलेला आहे. नुकताच हा दूसरा सीझन प्रदर्शित झाला असून लोकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. शेफाली शहा, राजेश तैलंग या कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा सगळेच करत आहेत. यांच्याबरोबर सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या तिलोत्तमा शोम या अभिनेत्रीची चांगलीच चर्चा होत आहे.
तिलोत्तमाने साकारलेली भूमिका ही नकारात्मक आणि मनाने अस्थिर अशी आहे. शिवाय यामध्ये ती सिरियल किलर दाखवली आहे. ही भूमिका तिलोत्तमाने उत्तमरित्या साकारली असून तिच्या अभिनयाची सगळेच प्रशंसा करत आहेत. या भूमिकेसाठी तिलोत्तमाने नेमकी कशी मेहनत घेतली काय तयारी की याविषयी तिने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
या मुलाखतीमध्ये तिलोत्तमाला तिच्या या भूमिकेच्या तयारीविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली, “मी माझ्या पहिल्या चित्रपटानंतर न्यूयॉर्कमध्ये ड्रामा थेरपीचं प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर मी राइकर आयलंडच्या जेलमध्ये काम केलं. तिथे महिला पुरुष सगळेच कैदी एकत्र होते. तिथल्या काही कैद्यांच्या बरोबर राहून आणि काम करून मी गुन्हा आणि त्यासाठी मिळणारी शिक्षा याबद्दल माहिती मिळवली. २ वर्षं त्या जेलमध्ये काम केल्यावर केवळ याच सीरिजसाठी नाही तर आयुष्यभरासाठी पुरतील असे धडे मी इथे गिरवले. कोणताही गुन्हा घडण्यामागे तो का घडतो ही गोष्ट जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असतं, आणि तेच मी दिल्ली क्राइमच्या लताच्या माध्यमातून मांडलं आहे.”
आणखी वाचा : धनुषची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘या’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; दिग्दर्शनाची धुरा धनुषच्या भावाच्या खांद्यावर
दिल्ली क्राइममधील तिलोत्तमाचं काम बघून तिला पुन्हा अशाच भूमिका मिळत आहेत, त्यावर तिलोत्तमा म्हणते की, “आता मी अशी भूमिका पुन्हा करणार नाही. परत तशीच भूमिका केली तर ते कंटाळवाणं ठरेल.” तिलोत्तमाच्या ‘मॉनसून वेडिंग’, ‘सर’, ‘किस्सा’, ‘चिंटू का बर्थडे’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.