प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतंच स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा दिल्लीतील शो रद्द करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी फारुकीला त्यांचा शो करण्यास परवानगी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. येत्या २८ ऑगस्टला दिल्लीत त्याचा शो आयोजित करण्यात आला होता. त्याच्या या शो ला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी मुनव्वर फारुकीचा शो करण्यास नकार दिला आहे.
मुनव्वर फारुकीचा दिल्लीतील शो रद्द करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलीस आयुक्तांना केली होती. त्याचा हा शो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि तसे न केल्यास याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या पत्रात म्हटले होते. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून याबाबतची मागणी केली होती. येत्या रविवारी दिल्लीत होणारा मुनव्वर फारुकीचा शो रद्द करावा, असेही त्यांनी या पत्रात म्हटले होते.
हेही वाचा : “सगळं संपलंय… गुडबाय”; स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या संदर्भात, मध्य जिल्हा पोलिसांनी युनिटला याबाबत एक अहवाल दिला होता. यात त्यांनी मुनव्वर फारुकीच्या शोमुळे परिसरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असे नमूद केले होते. यानंतर दिल्ली पोलिसांच्या लायसन्सिंग युनिटने मुनव्वर फारुकीचा शो करण्यासाठी परवानगी नाकारली आहे.
हेही वाचा : बजरंग दलाच्या धमकीनंतर मुनव्वर फारुकीचे मुंबईतले दोन कार्यक्रम रद्द
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जेसीपी (परवाना युनिट) ओपी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मुनव्वर फारुकीच्या शोबद्दल स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून एक अहवाल प्राप्त झाला आहे. यानंतर या शोची परवानगी रद्द करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या परवाना शाखेने २३ ऑगस्ट रोजी अर्जदार गुरसिमार सिंग रयत यांना केदारनाथ साहनी सभागृहात मुनव्वर फारुकीचा शो करण्यास परवानगी दिली होती. या परवानगीनंतर हा शो रविवारी २८ ऑगस्ट रात्री ९.३० वाजता आयोजित करण्यात आला होता.
तर विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी २५ ऑगस्टला दिल्ली पोलीस आयुक्तांना या शो बाबत पत्र लिहिले होते. या पत्रात फारुकीवर विविध आरोप करण्यात आले होते. फारुकी हा आपल्या कॉमेडी शोमध्ये हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवतो. त्यामुळे त्याचे शो रद्द करावेत, असे त्यांनी यात म्हटले होते. तसेच सुरेंद्र गुप्ता यांनी शुक्रवारी मध्यवर्ती जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन कमला मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.